पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता प्रवेशासाठी १ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यभरातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये १ लाख ९ हजार ८७ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी ३ लाख ५ हजार १५२ अर्ज दाखल झाले होते. प्रवेशासाठी सोडतीद्वारे १ लाख १ हजार ९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर सोडतीद्वारे प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६९ हजार ७४१ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चित केला.

त्यामुळे रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना १८ ते २४ मार्च या कालावधीत प्रवेश घेण्यास मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत प्रतीक्षा यादीतील ६ हजार ५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नियमित आणि प्रतीक्षा यादी मिळून ७५ हजार ७९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रतीक्षा यादीतील प्रवेशांसाठी चार फेऱ्या राबवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे २ एप्रिलनंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी संधी दिली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी रिक्त जागांनुसारच एसएमएस पाठवण्यात येईल. मात्र, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई संकेतस्थळावरील अर्जाची स्थिती पाहणे आवश्यक आहे. पालकांनी प्रवेश मिळालेल्या पत्राची प्रत आणि आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून ऑनलाइन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेत जाऊन प्रवेश घेणे गरजेचे आहे.