दुचाकीचोरीचे सर्वाधिक गुन्हे
शहरातील वाहनांची वाढती संख्या पाहता रस्त्यावर दुचाकी तसेच चारचाकी वाहने लावण्यासाठी जागेचा शोध घेण्याची कसरत वाहनचालकांना करावी लागते. शहराच्या मध्यभागात रस्त्याच्या कडेला वाहने लावण्यास जागादेखील मिळत नाही. वाहन लावले तर ते जागेवर असेल याची शाश्वती वाहनचालकांना नसते. कारण रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी वाहने चोरीला जातात. पोलिसांकडे दाखल होणाऱ्या वाहनचोरीच्या तक्रारी पाहिल्यास शहरातून दररोज आठ ते नऊ वाहने चोरीला जात असल्याचे उघडकीस आले आहे.
दुचाकींचे शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात दुचाकीचोरीचे गुन्हे वाढत आहेत. पुणे आणि पिंपरी शहर परिसरातून दररोज आठ ते नऊ वाहने चोरीला जात असून, यंदाच्या वर्षी नोव्हेंबरअखेपर्यंत शहरातून दोन हजार ८३६ वाहने चोरीला गेली आहे. त्यात दोन हजार ५४५ दुचाकी आहेत. चोरीच्या गुन्हय़ांचा वाढता आलेख पाहता पोलिसदेखील हतबल झाले आहेत.
दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण पाहता दाखल होणाऱ्या गुन्हय़ांची संख्या मोठी आहे. शहराच्या मध्यभागातून दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे. बाजीराव रस्त्यालगत असलेल्या नातूबाग परिसरात एका इमारतीत महाविद्यालयीन तसेच अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी चार ते पाच खासगी शिकवणी वर्ग आहेत. या भागात शेकडो विद्यार्थी त्यांची दुचाकी वाहने लावतात. या भागातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच शहरातील मध्यभागात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडील दुचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
एकेकाळी पुणे शहरात सायकलींचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जात होता. सायकलींचे पुणे ही ओळख केव्हाच मागे पडली असून ‘दुचाकींचे पुणे’अशी ओळख झाली आहे.
दुचाकींची सुरक्षा रामभरोसे
शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढीस लागल्या आहेत. दुचाकी चोरटय़ांना रोखण्यासाठी गुन्हे शाखेकडून वाहनचोरी प्रतिबंधक पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, शहरात घडणारे दुचाकी चोरींच्या गुन्हय़ांचे प्रमाण पाहता वाहनचोरी प्रतिबंधक पथकाकडून केले जाणारे प्रयत्न अपुरे आहेत. रस्त्यावर लावलेल्या दुचाकींची सुरक्षा रामभरोसे आहे. कारण चोरटे वाहनांचे हँडल लॉक तोडून दुचाकी लांबवतात, तसेच बनावट चावीचा वापर करून दुचाकी लांबवल्या जातात. दुचाकी चोरटय़ांना अटकाव घालणारे तंत्रज्ञान अद्याप तरी विकसित करण्यात आले नाही. त्या तुलनेत मोटारी आणि तीनचाकी वाहने चोरण्याचे प्रमाण कमी आहे.
