यंत्रमानवशास्त्र (रोबोटिक्स), इंटरनेट, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि डिजिटल निर्माण उद्योगामुळे तिसरी औद्योगिक क्रांती साकारली जाईल, असे मत केंद्र सरकारचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांनी गुरुवारी व्यक्त केले.
रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट इंजिनिअर्स (आर अँड डीई) आणि ‘द रोबोटिक्स सोसायटी ऑफ इंडिया’ यांच्यातर्फे आयोजित ‘अॅडव्हान्सेस इन रोबोटिक्स’ या विषयावरील तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. चिदंबरम यांच्या हस्ते झाले. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) महासंचालक अविनाश चंदर, ‘डीआरडीओ’ मुख्यालयाच्या संशोधन आणि विकास विभागाचे मुख्य नियंत्रक डॉ. एस. सुंदरेश, द रोबोटिक्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनजित सिंग आणि आर अँड डीईचे संचालक डॉ. एस. गुरुप्रसाद या वेळी उपस्थित होते. यानिमित्ताने भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये तीसहून अधिक उद्योगसमूह सहभागी झाले आहेत.
युद्धक्षेत्रातील नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये यंत्रमानवशास्त्राचा उत्तम वापर करून घेतला जात आहे, असे सांगून डॉ. चिदंबरम यांनी जागतिक पातळीवरील विविध संशोधन आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. ‘डीआरडीओ’तर्फे येत्या दशकामध्ये ‘रोबो सोल्जर’ तयार करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. रोबोटिक्सविषयी देशामध्ये एकीकृत कार्यक्रम आखण्याची गरज असून त्यासाठी उद्योग क्षेत्र आणि तज्ज्ञांनी एकत्रित कार्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
अविनाश चंदर यांनी रोबोटिक्स तंत्रज्ञानच्या लष्करातील वापराविषयीची माहिती दिली. कॉम्बॅट-अभियांत्रिकी क्षेत्रातील यंत्रमानवशास्त्राद्वारे विकसित केलेल्या उपकरणांची माहिती डॉ. एस. सुंदरेश यांनी दिली. मनजित सिंग यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. एस. गुरुप्रसाद यांनी प्रास्ताविक केले.
‘दक्ष’.. ‘गन माऊंटेड रोबो’
कमी जागेत मावेल असे ‘दक्ष’ आणि ‘गन माऊंटेड रोबो’ ही उपकरणे या प्रदर्शनातील सर्वाचे लक्ष वेधून घेणारी ठरली. संशयास्पद वस्तू असेल तर त्याचा शोध घेऊन ती वस्तू दुसरीकडे नेऊन ठेवणारे ‘दक्ष’ पूर्णत: रिमोटवर कार्यरत आहे. कोणत्याही पृष्ठभागावर चालू शकणारे आणि जिना चढू शकणारे अशी सुविधा यामध्ये आहे. मशिनगन आणि ग्रेनेड लाँचर यांचा समावेश असलेला गन माऊंटेड रोबो विकसित करण्यात आला असून याच्या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा सुरू आहे. ५०० मीटर अंतरावरील समोरच्या लक्ष्याचे छायाचित्र घेण्याची (इमेज ट्रॅकिंग) सुविधा असून यामध्ये बसविण्यात आलेला कॅमेरा १८० अंशामध्ये फिरू शकतो. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीओईपी) ‘फिश रोबो’चे प्रतिरुप विकसित केले आहे. यामध्ये कॅमेरा आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) बसविण्यात आली असून त्याद्वारे पाण्याखालची टेहळणी करणे शक्य होणार आहे.