राष्ट्र सेवा दलाने पुण्यात शुक्रवारी (९ फेब्रुवारी) ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विधीज्ञ असीम सरोंदे, समाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. परंतु, हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच कार्यक्रमाला गालबोट लागलं. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या चारचाकी वाहनावर हल्ला करण्यात आला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. कार्यक्रमस्थळी उपस्थित आयोजक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर दगडफेकही झाली. या हल्ल्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. दरम्यान यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांवरही हल्ला केला.

दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याचबरोबर हल्लेखोर भाजपा कार्यकर्त्यांच्या या कृत्यामुळे भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी या हल्ल्यावरून भाजपावर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, ही गुंडगिरी आहे. लोकशाही मार्गाने एखादा कार्यक्रम होत असेल आणि तुम्ही गुंडांना पुढे करत असाल तर आम्ही त्याचा निषेध करतो. हल्लेखोर काठ्या आणि दगड घेऊन तिथे आले होते. पुरेसे पोलीस तिथे नव्हते. जे काही ४०-५० पोलीस तिथे होते, ते लांबून तमाशा बघत होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, हल्लेखोरांमध्ये भाजपाचे पदाधिकारी होते. तसेच राष्ट्रवादीतून तिकडे गेलेले पळपुटे कार्यकर्तेही होते. त्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनात काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या आणि युवतींना मारहाण केली. असे हे लाचार लोक आहेत. महिलांच्या पोटात लाथा घातल्या, डोक्यात मारलं. जे लोक सहा महिन्यांपूर्वी भाजपाबरोबर गेले आहेत, त्यांनी भाजपाचे विचार अंगीकारले आहेत. तसेच त्यांना आता भाजपाची सवय लागली आहे. कारण आता ते महिलांना मारताना मागेपुढे बघत नाहीत.

हे ही वाचा >> VIDEO : “निखिल वागळेंवर हल्ला करणारे कुत्रे होते की…”, रोहित पवारांचा फडणवीसांना सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार रोहित पवार म्हणाले, हल्लेखोर तिथे विचारत होते, प्रशांत जगताप कुठे आहेत? रोहित पवार कुठे आहेत? इतर पाधिकारी कुठे आहेत? आम्ही त्यांना बघतो. अशा पद्धतीची वक्तव्ये हल्लेखोर करत होते. तुम्हाला जर आम्हाला मारायचं असेल तर मारा. आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही घाबरत असतो तर इथे आलो नसतो. लोकशाही वाचवण्यासाठी जे काही करायचं ते करू. तुम्ही महिलांना मारताय. तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे. एक गोष्ट सांगतो, या महिला आगामी काळात तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील.