पुणे : राज्यातील शासकीय, अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील (सीएचबी) १२ हजार ७८० अध्यापकांचे मानधन देण्यासाठी सुमारे ७४ कोटी १५ लाख रुपयांची देयके संबंधित कोषागार कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे सीएचबी अध्यापकांना दिवाळीपूर्वी मानधनाची रक्कम मिळणार आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी ही माहिती दिली. सीएचबी अध्यापकांचे मानधन वेळेत मिळत नसल्याचे सातत्याने समोर आले आहे.

सप्टेंबर महिन्यापर्यंत अनेक विद्यापीठांनी सीएचबी अध्यापकांची मान्यता प्रक्रियाच पूर्ण केली नव्हती. त्यामुळे संबंधित अध्यापकांचे मानधन रखडले होते. त्यामुळे विद्यापीठांनी सीएचबी अध्यापकांची मान्यता देण्याचे, तसेच विभागीय सहसंचालकांनी वेतन देयकांबाबत कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाने दिले होते.

‘उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील अनुदानित महाविद्यालयातील सीएचबी अध्यापकांना त्यांचे मानधन वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाहीस गती देण्याबाबत सातत्याने ऑनलाइन, ऑफलाइन बैठका आयोजित करण्यात आल्या. तसेच, अनुदानित महाविद्यालयातील १२ हजार ७८० सीएचबी अध्यापकांच्या मानधनाची ७४ कोटी १५ लाख रुपयांची देयके संबंधित कोषागार कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. सीएचबी अध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वी मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे,’ असे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.