कसबा पेठेतील कुंभारवाडय़ावर सध्या जत्रा लोटल्यासारखी गर्दी दिसते. रहदारीचा रस्ता, वर्दळीचा चौक आणि सहकुटुंब पणत्या खरेदीची लगबग! याच परिसरात, ‘आगे दुकान, पीछे मकान’ अशी सुमारे ३० कुंभार मंडळींची घरे सध्या दिवाळीच्या धामधुमीत आहेत. पणत्यांचे प्रकारसुद्धा ३०० पेक्षा अधिक, त्यातही प्रांत गणिकची विविधता, म्हणजे निवडीला भरपूर वाव. दरसुद्धा स्पर्धात्मक! गिऱ्हाईक सोडायचे नाही हीच ईर्षां! डोळे दिपून जावे अशी कलाकुसर आणि तुलनात्मकदृष्टय़ा अल्पदर, म्हणजे खरेदीला पर्वणीच. पणत्या रंगवून त्याची विक्री किंवा भेट देण्याकडे गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये वाढती क्रेझ आहे. कुंभारी कलेच्या बाजारपेठेचे हे नवे स्वरूप थक्क करणारे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मातीची भांडी, हा मानवी संस्कृतीशी निगडित असा प्राचीन विषय आहे. जगातील बहुतांश संस्कृती या नदीकाठीच वसल्या. मातीच्या भांडय़ांचे अवशेष हेच त्या त्या संस्कृतीचे पुरावे ठरले. मुठेच्या काठी वसलेल्या पुनवडी, कसबे पुण्याच्या पाऊलखुणा आजही येथील कुंभारवाडा सांगतो आहे. पुण्यनगरीची प्राचीन सीमारेषा सांगणारी कुंभारवेस, इथेच डेंगळे पुलाजवळ होती. कुंभार्ली, कासारली, माळी वस्ती, अशा त्या त्या समाजाच्या वस्त्या, मुख्यत्वे शिवकाळात विकसित झालय़ा. कसब्यामध्ये अठरा पगड जाती जमातीची घरे ही बलुत्यांच्या परस्पर सहकार्यातूनच उभी राहिली. शहराच्या विकासाबरोबर आणि बदलत्या जीवनशैलीमुळे, व्यवसायाच्या स्वरूपात, व्यवहारात आणि उत्पादनाच्या स्वरूपात बदल हे स्वाभाविक असतात. परिवर्तनाचे सर्व स्रोत सामावून, ज्ञानाची कास धरून, नव्या जमान्यात प्रगत समाजाच्या बरोबरीने कुंभार समाज विकासाची वाटचाल करतो आहे.समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी सुधीर चांदेकर आणि ज्ञानेश्वर चांदेकर यांचेकडून बरीच उपयुक्त माहिती मिळाली. आपल्या कृषिप्रधान संस्कृतीमध्ये, समाजाच्या चरितार्थाची तरतूदसुद्धा मोठय़ा खुबीने केल्याचे जाणवते. सणवाराला उपयुक्त साहित्य तयार करताना, बाराही महिने रोजगार मिळून चरितार्थाची सोय होते. नवरात्रामध्ये देवीचे घट आणि मूर्ती, दिवाळीमध्ये पणत्या, लक्ष्मी आणि बोळकी, संक्रातीला सुगडे, अक्षयतृतीयेला कऱ्हा आणि केळी (पूर्वजांचे पूजनासाठी), उन्हाळ्यात माठ आणि रांजण, श्रावणापासून पोळा, गौरी गणपती, हरतालिका.. असे सर्व सण या समाजाच्या अर्थकारणाला पूरक ठरतात.

कसबा पेठेतील कुंभारवाडय़ात समाजबांधवांची तीस घरे आणि दुकाने आहेत. या व्यतिरिक्त नवी पेठ आणि नाना पेठ येथेदेखील वस्ती असून, अगदी अलीकडच्या काळापर्यंत येथे चाकावरची कारागिरी आणि भट्टी लावली जात होती, असे रमेश शिंदे, राम चांदेकर, अशोक धानेपकर आणि विजय कुंभार यांनी सांगितले. पुणे मनपाच्या प्रकल्पानुसार आता बहुसंख्य व्यावसायिक टप्प्याटप्प्याने मुंढवा येथे स्थलांतरित होत आहेत. कुंभारी कामाबरोबर मूर्तिकला आणि वीटभट्टी व्यवसायातही ही मंडळी पूर्वापार आहेत.

आनंद सराफ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rush for diwali shopping in kumbharwada market kasba peth
First published on: 14-10-2016 at 02:46 IST