पुणे : पुत्रप्राप्तीची बतावणी करुन महिलेकडून तीन लाख १५ हजार रुपये उकळणाऱ्या भोंदूला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.गिरीश बलभीम सुरवसे (वय ३६, रा. शास्त्री चौक, आळंदी रस्ता, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूचे नाव आहे. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरवसेविरुद्ध महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यातील विविध कलमांन्वये, तसेच अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २६ वर्षीय महिला पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात राहायला आहे. दाेन वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. विवाहानंतर तिला अपत्यप्राप्ती होत नव्हती. तिने वैद्यकीय उपचार घेतले होते. महिला तिच्या गावी गेली. त्या वेळी ओळखीतील एकाने गिरीश सुरवसे याची माहिती दिली. सुरवसेला सिद्धी प्राप्त आहे. त्याच्याकडे गेल्यास पुत्रप्राप्ती होईल, असे तिला सांगण्यात आले. पुण्यात आल्यानंतर ती सुरवसे याच्याकडे गेली. सुरवसेने तिला अंगारा दिला, तसेच लवकरच पुत्रप्राप्ती होईल, अशी बतावणी करुन तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर सुरवसेने महिलेकडून वेळोवेळी पैसे उकळले.

महिलेने तिचे मंगळसूत्र विकले. सुरवसेला पैसे दिले. महिलेने पुत्रप्राप्तीसाठी मंगळसूत्र विकल्याची माहिती तिच्या पतीला मिळाली. सुरवसने फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी सुरवसेला अटक केली. आरोपी सुरवसेने अशा प्रकारे आणखी काही महिलांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे, अशी माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली.