पुणे : डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर पती आणि पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी रुग्णालयाला नोटीस बजावून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागानेही रुग्णालयाला नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे.

यकृत प्रत्यारोपणानंतर बापू कोमकर यांचा १५ ऑगस्टला मृत्यू झाला होता, तर दाता असलेल्या पत्नी कामिनी यांचा २२ ऑगस्टला मृत्यू झाला होता. रुग्णांच्या नातेवाइकांनी या प्रकरणी सह्याद्री रुग्णालयावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. रुग्णालयात घडलेल्या घटनेची माहिती उपसंचालक कार्यालयाला कळविणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे नोटिशीत म्हटले आहे. या नोटिशीला २४ तासांत उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बापू कोमकर आणि कामिनी कोमकर यांच्या यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णालय मान्यता समितीने दिलेल्या मंजुरीच्या आदेशाची प्रत, ध्वनिचित्रमुद्रण प्रत पेन ड्राइव्हसह सादर करण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला आहे. याचबरोबर या समितीसमोर दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती, बापू कोमकर यांच्यावरील शस्त्रक्रियापूर्व आणि पश्चात उपचाराची छायांकित कागदपत्रे, कामिनी कोमकर यांच्यावरील शस्त्रक्रियापूर्व आणि पश्चात उपचाराची छायांकित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश रुग्णालयाला देण्यात आले आहेत. यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विशेषज्ञाचा स्वाक्षरीसह लेखी खुलासा सादर करण्यासही रुग्णालयाला सांगण्यात आले आहे.

सह्याद्री रुग्णालयाला पाठविलेल्या नोटिशीला त्यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नाही. या शस्त्रक्रियेमध्ये दोन्ही रुग्णांच्या मृत्यूमागे कोणाचा हलगर्जीपणा झाला आहे का, याचीही माहिती रुग्णालयाकडून मागविण्यात आली आहे. याप्रकरणी रुग्णालयाचे उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. – डॉ. भगवान पवार, उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणानंतर पती व पत्नीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महापालिकेने रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रुग्णालयाने २४ तासांत यावर उत्तर देणे आवश्यक आहे. – डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका

आरोग्य विभागाच्या उपसंचालकांची नोटीस आम्हाला मिळाली आहे. आम्ही आरोग्य विभागाच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करीत आहोत. याप्रकरणी चौकशीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आरोग्य विभागाला देण्यात येत आहे. – सह्याद्री रुग्णालय (डेक्कन)