पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागांतर्गत राबवण्यात येणारा ‘सक्षमा प्रकल्प’ हा बचतगटांच्या महिलांना आर्थिक सक्षम करण्यास उपयुक्त ठरत आहे. या प्रकल्पांतर्गत जागृती महिला बचत गट आणि गुरूकृपा महिला बचत गटाच्या महिलांनी तीन हजार १४५ स्कूल बॅगचे शिवणकाम पूर्ण करून १२ लाख ५८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
महिला बचत गटांना सशक्त व सक्षम करण्यासाठी, त्यांना नागरी व आर्थिक मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी सक्षमा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या जागृती महिला बचत गट व गुरूकृपा महिला बचत गटाच्या महिलांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग शिवण्याचे काम दिले होते. या दोन्ही बचतगटांना २९ मे २०२५ रोजी तीन हजार १४५ स्कूल बॅग शिवण्यासाठी कार्यादेश देण्यात आला होता. त्यानंतर या बचत गटाच्या महिलांनी वेगाने काम सुरू केले. साहित्य खरेदी, तीन हजार १४५ स्कूल बॅगचे शिवणकाम, या बॅगची गुणवत्ता तपासणी आणि शाळेमध्ये प्रत्यक्ष स्कूल बॅग पुरवणे, हे काम या महिलांनी केवळ एका महिन्यात पूर्ण केले.
जागृती महिला बचत गटाच्या पुष्पा सौदा, प्राची कदम, हर्षा जंगले आणि चित्रा मोरे, गुरुकृपा महिला बचत गटाच्या शिल्पा कणसे, अनुराधा बेदरे, श्रावणी कणसे या महिलांनी स्कूल बॅग शिवण्याची १२ लाख ५८ हजार रुपयांचे काम पूर्ण केले. सक्षमा प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण घेऊन स्कूल बॅग शिवण्याचे काम पूर्ण करणाऱ्या या महिलांनी स्वावलंबनाची वाट धरली असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी म्हटले आहे.
बॅग तयार करून आजुबाजूच्या परिसरात विकत होते. परंतु, महापालिकेकडून मिळालेल्या कामामुळे मोठी स्वप्न पाहण्याचा आत्मविश्वास मिळाला. हे काम पूर्ण करताना आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या होत्या. महापालिकेचे काम रोजगारासाठी एक नवे क्षितिज उघडणारे ठरले आहे, प्राची कदम, जागृती महिला बचत गट
बचतगटाच्या महिलांनी दाखवलेले कौशल्य, शिस्त आणि निश्चय उल्लेखनीय आहे. बचत गटाच्या महिलांना उपजीविका निर्माण करून देण्याचे हे एक आदर्श नमुना आहे. उद्योजक, व्यावसायिकांनीही गणवेश, कार्यालयीन बॅग, इतर साहित्य पुरवण्याचे काम सक्षमा अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या बचतगटांना द्यावे. महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळेल. शेखर सिंह,आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका