scorecardresearch

“शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा”; संभाजी भिडेंचं विधान पुन्हा चर्चेत!

आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडेंचं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे.

sambhaji bhide statement on shivaji maharaj
फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम

आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडेंचं एक विधान सध्या चांगलंच चर्चेत आहे. शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा. महाराजांचा जन्म हा शिवनेरीवर झाला आहे. त्यामुळे त्यांची जयंती हिंदू पंचांगाच्या तिथीनुसारच साजरी झाली पाहिजे, असं ते म्हणाले. पुण्यातील जुन्नरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं.

हेही वाचा – “गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला आणि…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘त्या’ फोनकॉलचा प्रसंग!

नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे?

“आमची राज्य सरकारला विनंती आहे. शिवछत्रपतींना इंग्रजांच्या प्रसूतीगृहातून बाहेर काढा. महाराजांचा जन्म हा शिवनेरीवर झाला आहे. त्यामुळे त्यांची जयंती हिंदू पंचांगाच्या तिथीनुसारच साजरी झाली पाहिजे. आज त्यांचे नको इतके पुतळे उभारले जात आहेत. अरबी समुद्रात त्यांचे स्मारक होणार आहे. या समुद्रातील स्मारकाचा आणि शिवछत्रपतींच्या आयुष्याचा काहीही संबंध नाही. या स्मारकावर कोट्यवधी रुपये खर्च होणार आहे. सरकारने हे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नये”, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली.

हेही वाचा – “मी ३० ते ३२ वर्ष राजकीय जीवनात आहे, सत्तेत असतांना मी कधीच…”, अजित पवार यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

“शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर हिंदू स्वराज्य स्थापन झालं आणि ‘शिवशक’ सुरू झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि देशाच्या पंतप्रधानांनी हे लक्षात घ्यावं, ही स्वाभिमान ठासून भरलेला असा हा ‘शिवशक’ आहे. त्यामुळे अखिल भारतीय स्तरावर तो पोहोचला पाहिजे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – विधानपरिषद निवडणूक : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय; महाविकास आघाडीला मोठा धक्का!

दरम्यान, यापूर्वी संभाजी भिडेंची अनेक विधानं चर्चेत राहिली आहेत. काही दिवसांपूर्वीत त्यांनी महिला पत्रकाराशी बोलताना “तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 14:23 IST