पुणे : समुपदेशनासाठी बोलाविलेल्या एका तरुणाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

समीर हमीद शेख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मार्केट यार्ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा नशेच्या आहारी गेला होता. त्याने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रविवारी (१६ नोव्हेंबर) शंकरशेठ रस्त्यावरील उड्डाणपुलावरून त्याने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सोमवारी (१७ नोव्हेंबर) शेख याला कुटुंबीयांनी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते.

शेख व्यसनमुक्ती केंद्रातील समुपदेशकांना काही न सांगता बेपत्ता झाला होता. घरी परतल्यानंतर त्याने पत्नीला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. पत्नीने याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्याचे समुपदेशन केले. मुलासोबत शेख याला घरी पाठवून देण्यात आले.

त्यानंतर शेख याला मंगळवारी (१८ नोव्हेंबर) मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात समुपदेशनासाठी बोलाविण्यात आले होते. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास त्याने मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या छतावरून उडी मारली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरा अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.