शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ महापालिकेतर्फे उड्डाणपुलाचे काम सुरू असून या कामाची पाहणी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी बुधवारी केली. पुलाचे काही टप्प्यातील काम पूर्ण झालेले असल्यामुळे सीआयडी कार्यालय ते संचेती चौक दरम्यानचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश महापौरांनी या पाहणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चौकात पालिकेतर्फे उड्डाण पुलाचे काम सुरू असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी हा रस्ता तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवावा लागणार आहे. तसेच डेंगळे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्यामुळे जुना बाजार चौकातून महापालिकेकडे येणाऱ्या पीएमपी गाडय़ांनाही रस्ता उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पुलाचा एक भाग वाहतुकीसाठी खुला करावा, असा आदेश महापौरांनी बुधवारी दिला. श्रीनिवास बोनाला, नामदेव बारापात्रे, विजयकुमार शिंदे हे महापालिकेचे अधिकारी तसेच वाहतूक पोलिस विभागाचे आणि पीएमपीचे अधिकारीही या पाहणीच्या वेळी उपस्थित होते.
महापौरांनी दिलेल्या आदेशानुसार अभियांत्रिकी महाविद्यालय चौकातील नियोजित उड्डाणपुलापैकी ए पूल म्हणजेच सीआयडी कार्यालय ते संचेती चौक या टप्प्यातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.