पुणे : शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न अधिकाधिक बिकट होत असून महापालिकेने कारवाई करण्याचे ठरविल्यास प्राणीमित्र त्यासाठी कडाडून विरोध करतात. त्यामुळे महापालिकेला अनेकदा माघार घ्यावी लागते. मात्र, भटक्या श्वानांच्या वाढत्या त्रासाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने देखील आदेश दिले आहेत. या आदेशाचा सविस्तर अभ्यास करुन महापालिकेने भटक्या श्वानांवर कारवाई करुन पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. पुणे शहर आणि उपनगरांच्या परिसरात भटक्या श्वानांचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतो. यामध्ये प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस झुंडीने फिरणाऱ्या आणि दुचाकीस्वारांसह पायी चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर हल्ला भटके श्वान करतात. पहाटे फिरायला घराबाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या श्वानांचा त्रास सहन करावा लागतो. वाहनचालकांच्या गाड्यांमागे धावून त्यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करणाऱ्या श्वानांवर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.

खर्डेकर म्हणाले, शहरात दररोज सुमारे ८० नागरिकांना भटके श्वान चावा घेतात. यामुळे नागरिकांना महाभयंकर त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे महापालिकेने यापूर्वी दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलून या श्वानांना पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्याची व्यवस्था करावी. जे प्राणीमित्र भटक्या श्वानांवर दया दाखवून त्यांना सर्रासपणे रस्त्यावर खाऊ घालतात, अशा प्राणीमित्रांवर देखील महापालिकेने दंडात्मक कारवाई करावी. रस्त्यावर प्राणीप्रेम दाखविणाऱ्या आणि इतर नागरिकांना होणाऱ्या त्रासाची पर्वा न करणाऱ्यांना भटके श्वान भेट देऊन त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी संबधित प्राणीप्रेमींवर द्यावी.

न्यायालयाच्या सूचनेनुसार भटक्या श्वानांना खाऊ घालण्यासाठीची जागा निश्चित करताना सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. भटक्या श्वानांना पकडून त्यांची उत्पत्ती वाढू नये, यासाठी श्वानांच्या नसबंदीची प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण कशी होईल, याकडे लक्ष द्यावे. तसेच ज्या संस्थेला श्वानांच्या नसबंदीचे काम देण्यात आले आहे. त्या संस्थेने नसबंदीची आकडेवारी जाहीर करावी. तसेच त्यांच्या गळ्यात ठळकपणे दिसतील अशा लाल किंवा अन्य रंगाचा पट्टा घालावा, अशी मागणीही भाजपचे प्रवक्ते आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

भटक्या श्वानांची चावा घेतलेल्या तसेच त्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची तसेच रेबिज झालेल्या नागरिकांची सविस्तर आकडेवारी देखील महापालिकेने राज्य सरकारला पाठवून द्यावी, असेही खर्डेकर म्हणाले.