पुणे : गेल्या वर्षी २०२४ मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुमठेकर रस्त्यावर एक आपत्कालीन घटना घडली होती. त्यावेळी वैद्यकीयच्या विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवून हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाला सीपीआर देऊन त्याचा जीव वाचविला होता. या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना जीवनरक्षक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी संजीवनी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट अँड डेव्हलपमेंट इन ॲक्सेसिबल रिसोर्सेस (आदर फाउंडेशन पुणे) आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या वतीने ‘संजीवनी’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. हा उपक्रम म्हणजे जीवनरक्षक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण कार्यशाळा असून, यंदाच्या गणेशोत्सवात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत वैद्यकीय विद्यार्थी तसेच ढोल-ताशा पथकातील वादक यांना प्राथमिक जीवनरक्षक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अनुभवी डॉक्टरांतर्फे देण्यात येणार आहे. त्यात सीपीआर उपचारासोबत चक्कर येऊन बेशुद्ध पडणे, अस्थमा, अपस्माराचा झटका यावरील प्राथमिक उपचारांचा समावेश आहे.
या उपक्रमाचा उद्देश गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या वादक, स्वयंसेवक व नागरिकांना जीवनरक्षक उपायांची अंमलबजावणी करता यावी यासाठी सज्ज करणे हा आहे. या उपक्रमांतर्गत प्रशिक्षित स्वयंसेवक यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत संजीवनी स्वयंसेवक म्हणून कार्यरत असतील. पुण्यातील प्रमुख लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि टिळक रस्त्यावरील मिरवणुकीत हे स्वयंसेवक मदतीसाठी तैनात असतील. या उपक्रमाच्या संयोजनात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. सुनील इंगळे, सचिव डॉ. रणजीत घाटगे व डॉ. अंजली साबणे, आदर फाउंडेशनचे अध्यक्ष स्वानंद पाटील, सचिव तन्वी केळकर व खजिनदार अथर्व परांजपे यांचा सहभाग आहे.
चुकीची मदत जीवघेणी
याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे कार्यकारी विश्वस्त डॉ. संजय पाटील म्हणाले की, गेल्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुमठेकर रस्त्यावर एक आपत्कालीन घटना घडली होती. त्यावेळी वैद्यकीय विद्यार्थी व ताशावादक स्वानंद पाटील याने प्रसंगावधान दाखवून हृदयविकार आलेल्या एका नागरिकाला सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचवले. मात्र, या घटनेपूर्वी अनेकांनी याबद्दल माहिती नसल्यामुळे चुकीची मदत केली होती. त्यात जबरदस्तीने पाणी पाजणे, कांदा हुंगवणे अशा प्रकाराच्या उपायांचा समावेश आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडली असती. या प्रकारामुळे जीवनरक्षक प्रशिक्षणाची अधिक प्रकर्षाने गरज समोर आली आहे.