पिंपरी : संतशिरोमणी तुकाराम महाराजांच्या परतवारीच्या पालखीचे आळंदीत फुलांच्या वर्षावात रविवारी भव्य स्वागत करण्यात आले. पालखीचे आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाल्याचे अद्भुत दृश्य साऱ्यांनी अनुभवले. वारकरी, ग्रामस्थांनी हृदयातून आलेल्या भक्तिभावासह फुलांची उधळण केली आणि टाळ-मृदंगाच्या गजरात तुकोबांच्या पालखीचे जंगी स्वागत केले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज या दोन्ही संतांच्या पालखीचा १७ वर्षांनी झालेल्या भेटीचा अनुपम सोहळा पाहण्यासाठी अलोट गर्दी झाली होती.
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरहून विठ्ठलाचे दर्शन घेऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सायंकाळी साडेसहा वाजता आळंदीत दाखल झाली. माउलींच्या जयघोषात पालखीचे स्वागत करण्यात आले. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर वीणा मंडपातून माउलींच्या मंदिरात पालखी सोहळा आरतीने विसावला. यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा आहे. यानिमित्त या दोन संतांची भेट होण्यासाठी यावर्षी सोहळा आळंदीला नेण्याची मागणी आळंदी देवस्थानने देहू देवस्थानला केली होती. त्यानुसार १७ वर्षांनी तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास आळंदीत दाखल झाली.
फुलांच्या वर्षांवात तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. इंद्रायणी नदीकाठी, चाकण चौकासह ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. वारकऱ्यांनी दोन्ही संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा डोळ्यात साठवून ठेवला. या संतभेटीचे लाखो वारकरी, भाविक, नागरिक साक्षीदार ठरले. या अनुपम सोहळ्यासाठी पंचक्रोशीतून भाविक, नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करीत पादुकांचे दर्शन घेतले. तुकाराम महाराजांच्या पालखीचा रविवारी आळंदीत मुक्काम झाला. सोमवारी (२१ जुलै) सकाळी पालखी देहूकडे मार्गस्थ होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज माेरे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मुख्य विश्वस्त याेगी निरंजन नाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे या वेळी उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज आणि श्री मोरया गोसावी पालखीची भेट
जगद्गुरू संत तुकाराम महाराज व श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या पालखीची चिंचवडगावात भेट झाली. एकत्रित पालखीचा सोहळा पाहण्यास भाविकांची गर्दी झाली होती. दोन्ही पालख्या शेजारी ठेवून पालखी सोहळा प्रमुख गणेश महाराज मोरे आणि श्री मोरया गोसावी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मंदार महाराज देव यांच्या हस्ते आरती करण्यात आली. विश्वस्त जितेंद्र देव महाराज, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप, देवराज डहाळे या वेळी उपस्थित होते.