पुणे : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स (मार्ड) या संघटनेने पुकारलेल्या संपामध्ये पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील निवासी डॉक्टरही सहभागी झाले आहेत. रुग्णालयातील सुमारे ६०० निवासी डॉक्टर या संपात सहभागी झाले असून राज्य सरकारकडून अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही होत नसल्याने हा संप पुकारण्यात आल्याचे ‘मार्ड’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

निवासी डॉक्टरांचा संप असल्याने अतिदक्षता विभाग आणि अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित कामकाज बंद ठेवण्यात येणार असल्याचे मार्डकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाने ज्येष्ठ निवासी डॉक्टरांसाठी १४३२ पदांची निर्मिती करावी, निवासी डॉक्टरांसह वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहांची दुरवस्था तातडीने दुरुस्त करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

हेही वाचा – पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये जमीन खरेदीकडे कल, मालमत्ता खरेदी-विक्रीतून पाच हजार कोटींचा महसूल

निवासी डॉक्टरांनाही सातव्या वेतन आयोगाप्रमाणे महागाई भत्ता द्यावा, कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करण्यात यावी, तसेच करोना काळात निवासी डॉक्टरांनी बजावलेल्या वैद्यकीय सेवेचा थकबाकी मोबदला तातडीने देण्यात यावा, अशा मागण्या मार्डकडून समोर ठेवण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध मागण्यांसाठी संप करतानाच अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विस्कळीत होऊ न देणे आणि रुग्णांची गैरसोय न करणे हा आपला प्राधान्यक्रम असल्याचे ससून मार्ड शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.