पुणे : सातारा जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत बालाजी जाधव या प्रयोगशील शिक्षकाची उमंग या शैक्षणिक पाठ्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. या पाठ्यवृत्तीसाठी देशभरातील ५० प्रयोगशील शिक्षकांची निवड करण्यात आली असून, त्यात बालाजी जाधव हे राज्यातील एकमेव शिक्षक आहेत.

फ्लोअरशिंग माइंड्स फंड, अमेरिका यांच्या आर्थिक सहकार्यातून मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सतर्फे (टिस) ‘उमंग’ या पाठ्यवृत्तीसाठीची निवड प्रक्रिया राबवण्यात आली. तीन फेऱ्यांतून पाठ्यवृत्तीसाठी पात्र शिक्षकांची निवड करण्यात आली. निवड झालेले बालाजी जाधव हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर (पर्यंती) येथे कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील या शाळेत जाधव यांनी धनुर्विद्या, साबण तयार करणे, परदेशी भाषा शिक्षण, मोडी लिपी शिक्षण, शिक्षणात टॅब आणि स्मार्ट बोर्डचा उपयोग असे नावीन्यपूर्ण प्रयोग करत शाळेची पटसंख्या वाढवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘उमंग या एक वर्षाच्या पाठ्यवृत्तीमध्ये शिक्षणातील अभिनव प्रयोगाची उत्तम राबवणूक कशी करावी, विद्यार्थ्यांचा सामाजिक भावनिक विकास, जगभरातील शिक्षणाच्या आधुनिक व अभिनव अध्यापन पद्धती, विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान, नवनव्या साधनांचा शिक्षणामध्ये वापर याबाबतचे मार्गदर्शन पाठ्यवृत्तीमध्ये करण्यात येणार आहे. आजवर विविध पुरस्कार मिळाले असले, तरी या पाठ्यवृत्तीद्वारे स्वतःला समृद्ध होण्याची, देशभरातील ५० प्रयोगशील शिक्षकांबरोबर काम करण्याची संधी मिळणार आहे. पाठ्यवृत्तीद्वारे मिळणाऱ्या शिक्षणाचा फायदा जिल्हा परिषद शाळेतील मुलांना देता येणार आहे, ही बाब अधिक आनंदाची आहे,’ अशी भावना बालाजी जाधव यांनी व्यक्त केली.