पुणे : जुलै महिन्यातील अखेरचे सुट्टीचे वार (शनिवार, रविवार) पुणेकरांच्या दृष्टीने वाहतूक कोंडीचे ठरले. शहरातील मध्यवर्ती पेठांपासून बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्या, कात्रज-कोंढवा, सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता आदी ठिकाणी वाहतूक कोंडी दिसून आली. त्यामुळे खरेदीसाठी तसेच पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना रस्त्यातच अडकून पडावे लागले.
शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या तुरळक सरी कोसळत असून, रस्त्यांवर पडलेले खड्डे, दुरुस्तीची कामे आणि अस्ताव्यस्त रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने ही वाहतूक कोंडीला कारण ठरली. शाळा, महाविद्यालयांना तसेच शासकीय आणि बहुतांश खासगी कार्यालयांना सुट्टी असताना शनिवारी, रविवारी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. अवजड वाहनांना शहरात दुपारची बंदी असताना प्रमुख रस्त्यांवर बिनदिक्कत अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती. श्रावणानिमित्त धार्मिक ठिकाणी गर्दी होत असून, गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे, मंडप उभे करण्याचे कामकाज सुरू असल्याने कोंडीत आणखी भर पडल्याचे दिसून आले.
नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता ते कृषी महाविद्यालय, मंडई, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्त्यावर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या. दुचाकीचालक अडचणीतून वाट काढत रस्त्यांवरून मार्गस्थ होत असल्याचे दिसून आले. रस्त्यांलगत असलेल्या पदपथांवरून चालणेही जिकिरीचे झाले. वस्तू विक्री, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी पदपथांवर व्यवसाय थाटल्याने आणि रस्त्याच्या कडेला वाहने उभी असल्याने अरुंद रस्त्यातून मार्ग काढावा लागला. विशेषत: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना समस्या निर्माण झाल्या. खरेदीनिमित्त किंवा सुट्ट्यांसाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. स्थानिकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
रस्त्यांची दुरावस्था
शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाणी साचत असल्याने वाहतूक मंदावत आहे, तर सिंहगड रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी उड्डाणपुलांचे काम सुरू असल्याने बाणेर, पाषाण किंवा औंधकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सातत्याची झाली आहे. तसेच, रस्त्यांवर अतिक्रमण त्यामुळे अरुंद झालेले रस्ते वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत असल्याचे निरीक्षण परिसर संस्थेचे संचालक रणजित गाडगीळ यांनी नोंदवले.
नांदेड सिटी येथून लक्ष्मी रस्त्यावरील साहित्य खरेदी करण्यासाठी घरातून निघालो. वाहतूक कोंडीमुळे लक्ष्मी रस्त्यावर पोहोचण्यासाठी साधारणत: दीड ते पावणेदोन तासांचा अवधी लागला.- विक्रांत कुलकर्णी, दुचाकीचालक