पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्रे आता अधिक सुरक्षित होणार आहे. विद्यापीठाने गुणपत्रक, प्रमाणपत्रांच्या छपाईची मुद्रणपूर्व सामग्री आता नाशिकच्या भारतीय सुरक्षा छापखान्याकडून (इंडियन सिक्युरिटी प्रेस) खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांना अतिरिक्त सुरक्षा वैशिष्ट्ये प्राप्त होणार आहे.
भारतीय सुरक्षा छापखाना ही जगात सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या छापखान्यांपैकी एक आहे. भारतासह अनेक देशातील पारपत्र, १० रुपयांपासून ५० हजारापर्यंतचे मुद्रांक, महसूल विभागाचे मुद्रांक, लष्करी आस्थापनांची ओळखपत्रे, विद्यापीठे, केंद्रीय विद्यालयांची गुणपत्रके अशी छपाईची कामे नाशिकच्या छापखान्यात होतात. या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाची प्रमाणपत्रे सुरक्षित, गोपनीय पद्धतीने करण्याच्या दृष्टीने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलसचिव प्रा. ज्योती भाकरे, परीक्षा संचालक डॉ. प्रभाकर देसाई, अधिष्ठाता डॉ. सुप्रिया पाटील, डॉ. संदेश जाडकर, डॉ. विजय खरे, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. संजय तांबट, डॉ. चारुशीला गायके यांच्या समितीने ही खरेदी प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने भारतीय सुरक्षा छापखान्याला भेट देऊन अधिकाऱ्यांशी संवाद साधूून माहिती जाणून घेतली. त्यानंतर अहवाल सादर केला. त्यानुसार सुरक्षा मानके, कागदाचा नमूना, गोपनीयता आणि विश्वासार्हता या अनुषंगाने मुद्रणपूर्व साधनसामग्री भारतीय सुरक्षा छापखान्यातून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद आणि खरेदी समितीने मंजुरी दिली आहे.
विद्यापीठाचे प्रमाणपत्रासाठी इंडियन सिक्युरिटी प्रेसकडून साधनसामग्री खरेदी करण्याची मागणी दोन वर्षापूर्वी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत केली होती. त्यानंतर विद्यापीठाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे विद्यापीठाच्या खर्चात कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे. तसेच प्रमाणपत्रांची सुरक्षितता वाढणार आहे, असे व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांनी सांगितले.