पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओने द्विदशकपूर्ती साजरी केली. आताच्या काळात स्मार्टफोनचा वापर वाढत असल्याने विद्यावाणीचेही मोबाइल ॲप विकसित करण्यात आले असून, वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ऐकता येतो. गेल्या वीस वर्षांत विद्यावाणीने कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान -तंत्रज्ञान, समाजकारण, संस्कृती अशा अनेक विषयांवर कार्यक्रम, मालिका प्रसारित केल्या आहेत. विद्यावाणीसाठी संकल्पक डॉ. के. आर.
सानप, प्रथम संचालिका श्रीमती उष:प्रभा पागे, यापूर्वीचे संचालक आनंद देशमुख यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कम्युनिटी रेडिओचे जाळे अधिक विस्तारण्यासाठी विद्यावाणीने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन केंद्र सरकारने विद्यावाणीला ‘लीड कम्युनिटी रेडिओ’ म्हणून प्रमाणित केले आहे. विद्यावाणीच्या कार्यक्रमांचे दररोज सकाळी सात ते रात्री आठ या वेळात सलग तेरा तास प्रसारण सुरू आहे.
विद्यावाणीच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विद्यापीठात कार्यरत कर्मचारी आणि निवडक विद्यार्थ्यांसाठी ‘व्हॉइस कल्चर’ कार्यशाळेचे आयोजन, महिला मुक्ती चळवळीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक कार्यक्रम मालिका सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रम मालिकेच्या पहिल्या भागाचे ध्वनिमुद्रण नुकतेच पूर्ण करण्यात आले. त्यात विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत लेखिका कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी घेतली. त्यात स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या पाच दशकांतील विविध घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. येत्या काळात विद्यावाणी रेडिओवरून अधिकाधिक लोकांच्या सहभागाने पुणे परिसरातील श्रोत्यांच्या नागरी आणि सामाजिक समस्यांची उकल करणारे प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती प्रभारी संचालक श्रीदत्त गायकवाड यांनी दिली. विद्यावाणीच्या द्विदशकपूर्तीनिमित्ताने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, वित्त व लेखाधिकारी चारुशीला गायके यांनी शुभेच्छा दिल्या.