पुणे : ‘है दुनिया उसी की जमाना उसी का, मुहोब्बत में जो हो गया हो किसी का’ या गीताचे सूर निनादले आणि सॅक्सोफोन वादनातून या वाद्यावर हुकूमत असलेल्या तीन वादकांना सोमवारी स्वरांजली अर्पण करण्यात आली. हे गीत सॅक्सोफोनवर वाजवतानाच मोहम्मद रफी यांच्या स्वरांची जादू इक्बाल दरबार यांच्या आवाजामध्ये ऐकायला मिळायची, याचेही सर्वांना स्मरण झाले.
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आणि श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टतर्फे श्रीपाद सोलापूरकर, सुशील शिरसाट आणि इक्बाल दरबार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, मेलडी मेकर्स ऑर्केस्ट्राचे संस्थापक अशोककुमार सराफ, संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर, जितेंद्र भुरूक, संदीप पंचवाटकर, वसंत बल्लेवार, मोहनकुमार भंडारी, श्रीधर कुलकर्णी, विवेक परांजपे, अनिल गोडे, जयंत जोशी, आनंद सराफ, प्रकाश भोंडे, आरती दीक्षित, रत्ना दहिवलेकर, विजय केळकर, किशोर सरपोतदार यांनी या कलाकारांच्या स्मृतींना उजाळा दिला.