नारायणगाव : विवाह होत नसलेल्या तरुणांना हेरून त्यांच्याशी लग्न करून त्यानंतर आर्थिक फसवणूक करणारी आठजणांची टोळी नारायणगाव पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या टोळीतील तीन महिलांसह सातजणांना गजाआड करण्यात आले आहे. या टोळीने जुन्नर, शिरूर, ओतूर आणि पारनेर परिसरात अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे.
सुवर्णमाला वाडकर (रा. छत्रपती संभाजी नगर), भारती दामोदर मोरे (रा. डोणगाव इंदिरानगर ता. मेहकर, जि. बुलढाणा), अश्विनी जगदाळे (रा. १६५/ पी, पर्वती दर्शन, पुणे), सुनील काळे (रा. पंचतळे, शिरूर), पंकज डग (रा. पंचतळे, शिरूर) , नामदेव कोल्हे (रा. जांबुत, ता. पारनेर जि. अहिल्यानगर) संतोष सखाराम घोडे (रा. पिंपळनेर,जालना रोड, ता. देऊळगाव जि. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली आहे. एक महिला फरार असल्याचे नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी सांगितले.
गावांमधील विवाह होत नसलेल्यांना हेरून त्यांचे लग्न लावून देणारी ही टोळी आहे. लग्न झाल्यानंतर संबंधित महिला या काहीतरी कारण सांगून पळून जातात. त्यांच्याकडून तरुणांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात येते. या टोळीने सात लग्न करून तरुणांची फसवणूक केल्याचे तपासात निदर्शनास आले असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.
नारायणगावमधील एकाने दिलेल्या तक्रारीवरून या टोळीला बुलढाणा जिल्ह्यातील मूळ गावी जाऊन ताब्यात घेण्यात आले. या टोळीने अनेक तरुणांना फसवले आहे. नारायणगाव येथील गुन्ह्यातील महिलेला १६ वर्षाची मुलगी आणि १४ वर्षाचा मुलगा आहे. या महिलेने अशाप्रकारे सहा ते सात तरुणांना फसवले आहे. या टोळीतील एका महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या टोळीने जुन्नर, ओतूर, शिरूर, पारनेर या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे शेलार यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक जगदेवाप्पा पाटील यांनी ही कामगिरी केली.