पुणे : विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर महाविद्यालये, विद्यापीठांनी त्यांची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहेत. राज्य शासन, विद्यापीठाने निश्चित केलेल्या शुल्काप्रमाणे महाविद्यालयांनी अभ्यासक्रम शुल्काबाबत माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच, शुल्क निश्चितीबाबतची कागदपत्रे महाडीबीटी संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांतर्फे शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे राबवण्यात येतात. त्यात उच्च शिक्षण संचालनालयाच्या १४ शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६साठी महाडीबीटी संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी महाविद्यालय, विद्यापीठाचे खाते अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यात महाविद्यालयाचे नाव, पत्ता, लिपिक, प्राचार्य यांचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, महाविद्यालयातील अभ्यासक्रम, त्यांचे शुल्क यांचा समावेश आहे. ही माहिती अद्ययावत करण्याची सुविधा १७ जूनपासून सुरू करण्यात आली आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांसाठी १६ प्रकारच्या इतर शुल्कांचा लाभ देण्यात येतो. मात्र, महाडीबीटी संकेतस्थळावर १० घटकांचाच समावेश असल्याने महाविद्यालयांनी इतर शुल्कांची माहिती भरावी. शुल्कासाठी जबाबदार प्राधिकरणाकडून कोणताही बदल झाल्यास त्याप्रमाणे बदल करण्यात यावेत. महाविद्यालयाने संकेतस्थळावर नमूद केलेले अभ्यासक्रम, त्यांचे शुल्क यांच्या आधारेच शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मंजूर करण्यात येणार असल्याने संबंधित माहिती अचूक असणे आवश्यक आहे.
महाविद्यालयांनी त्यांचे अभ्यासक्रम आणि शुल्क याबाबतची माहिती १ डिसेंबर २०२५ पर्यंत भरून त्यास संबंधित विभागीय सहसंचालक, शिक्षणशुल्क समिती, शुल्क नियामक प्राधिकरण यांच्याकडून मान्यता घेणे आवश्यक आहे. महाविद्यालयांनी त्यांच्या अभ्यासक्रम शुल्काची माहिती भरताना अभ्यासक्रमाचा जितका कालावधी असेल, त्यापेक्षा दोन वर्षे अधिक कालावधीच्या शुल्काची माहिती भरावी. महाविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि शुल्क याबाबतच्या माहितीस विभागाने मंजुरी दिल्यानंतर ही माहिती महाडीबीटी संकेतस्थळावर दर्शवली जाते. त्यानंतर त्या माहितीमध्ये बदल करता येत नाही. विभागाने दिलेल्या शुल्कानुसारच शिष्यवृत्तीचे लाभ देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्याबाबत दक्षता घेणे गरजेचे असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.