लोणावळ्यात दोन वर्षांच्या बालकाचा बंगल्यातील जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर तुंगार्ली भागातील एका बंगल्यातील जलतरण तलावात वीजेच्या धक्क्याने १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली आहे. लोणावळा, खंडाळा परिसरातील खासगी बंगल्यांमधील सुरक्षेचा प्रश्न अशा प्रकारच्या दुर्घटनांमुळे ऐरणीवर आला आहे. लोणावळ्यात खासगी बंगल्याच्या आवारात घडलेली ही दुसरी दुर्घटना आहे.

हरुन मसूद वली (वय १३, रा. भायखळा, मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. मोहमद साजीद खान आणि त्यांचे नातेवाईक वर्षाविहारासाठी लोणावळ्यात आले होते. त्यांनी तुंगार्ली परिसरातील क्रिसेंट बंगला भाडेतत्वावर घेतला होता. गुरूवारी (२८ जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास खान आणि त्यांचे भाचे जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरले. हरुन पाण्यात पोहत होता. पोहून झाल्यानंतर तो जलतरण तलावातून बाहेर पडला. तेथे लावलेल्या एका दिव्याला त्याचा चुकून स्पर्श झाला. काही कळायच्या आता हरून कोसळला आणि तो बेशुद्ध पडला. त्याला वीजेचा धक्का बसल्याचे लक्षात आल्यानंतर खान यांनी त्वरीत या घटनेची माहिती लोणावळा शहर पोलिसांना दिली. हरुनला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. नेमकी दुर्घटना कशी घडली, याची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बंगल्यांच्या आवारात बेकायदा जलतरण तलाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोणावळा, खंडाळा परिसरात पुणे-मुंबई परिसरातील मोठ्या संख्येने पर्यटक वर्षाविहारासाठी येतात. सहकुटुंब येणारे पर्यटक भाडेतत्वावर बंगले घेतात. अनेक बंगल्यांच्या आवरात पर्यटकांच्या दृष्टीने पुरेशा सुरक्षाविषयक उपाययोजना नसल्याचे आढळून आले आहे. बंगल्यात असलेल्या जलतरण तलावांना नगरपरिषद तसेच पोलिसांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक बंगल्यात बेकायदा जलतरण तलाव बांधण्यात आले आहेत. अशा जलतरण तलावांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आठवड्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरुर परिसरातील दाम्पत्य सहकुटुंब जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. त्या वेळी जलतरण तलावात बुडून दोन वर्षांच्या बालकांचा मृत्यू झाला होता.