टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे वैज्ञानिक डॉ. निस्सीम काणेकार यांची भावना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मला भटनागर पुरस्कार मिळाल्याबाबत आनंदच आहे पण त्यापेक्षा जास्त आनंद संशोधनाच्या कामातून मिळतो,’ अशी भावना पुण्यातील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या ‘दी नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ या संस्थेचे वैज्ञानिक डॉ. निस्सीम काणेकार यांनी सीएसआयआरचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केली. ते मूळ गोव्याचे आहेत.

ते म्हणाले, की ‘रेडिओ भौतिकशास्त्रात काम करण्यात मला आनंद वाटतो, पुणे विद्यापीठात असलेल्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे जे केंद्र आहे, ते रेडिओ भौतिकीतील संशोधनासाठी देशातील एक उत्तम ठिकाण आहे. तेथे प्रगत सुविधा आहेत. नारायणगावमधील खोडद येथे जी रेडिओ दुर्बिण आहे, तिची क्षमता खूप मोठी आहे. असे असले तरी यापुढील सहासात वर्षांच्या काळात या दुर्बिणीचा विस्तार करण्यात येणार असून तेथे आणखी तीस ते चाळीस संच लावले जाणार आहेत; त्यामुळे ती जगातील शक्तिशाली रेडिओ दुर्बिण असेल. सध्या चिलीतील अटाकामा वाळवंटासह अनेक ठिकाणच्या रेडिओ दुर्बिणींच्या मदतीने मी संशोधन करीत आहे. चिलीतील या दुर्बिणीच्या मदतीने आम्ही आकाशगंगेसारख्या सर्पिलाकार दीíघकांचे १२ अब्ज वर्षांपूर्वीचे नवजात रूप पाहू शकलो या शिवाय या दीर्घिकातील वायूंचे वस्तुमान (गॅस मास) ठरवण्यासाठी आम्ही केलेले संशोधन हे महत्त्वाचे ठरले आहे. आयुका व एनसीआरए या दोन्ही संस्था या क्षेत्रात संशोधनासाठी उत्तम आहेत व तेथे काम करण्याची संधी मिळाली, हे मी भाग्यच समजतो. माझे वडील मुंबई विद्यापीठात प्राध्यापक होते, त्यांनी एकदा खगोलशास्त्रावरचे पुस्तक आणले होते. ते वाचले आणि तेव्हापासून खगोलशास्त्राची गोडी लागली ती कायमचीच.. नंतर मुंबई विद्यापीठातील शिक्षणानंतर मी पुण्यात आलो व पीएचडी करीत असतानाच रेडिओ खगोलशास्त्रातील संशोधनाकडे वळलो.’

रेडिओ खगोलशास्त्राच्या माध्यमातून परग्रहावरील जीवसृष्टी सापडण्याची कितपत शक्यता वाटते असे विचारले असता त्यांनी सांगितले, की ‘यात दोन मुद्दे येतात. एकतर परग्रहावर जीवसृष्टी आहे का व दुसरे म्हणजे ती सापडणार का, माझ्या मते परग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे, ती शक्यता किती प्रमाणात हे सांगता येणार नाही पण केप्लर दुर्बिणीने आतापर्यंत जे बाह्य़ग्रह शोधले आहेत, त्यांचा विचार करता सूर्यासारख्या ताऱ्यांभोवती फिरणारे जीवसृष्टीस अनुकूल ग्रह असू शकतात व तेथून जर काही संदेश पाठवले जात असतील, तर ते रेडिओ संदेशाच्या रूपातच असतील. त्यामुळे परग्रहावरील जीवसृष्टीची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी रेडिओ खगोलशास्त्राचा उपयोग होतो, याबाबत भारतीय वैज्ञानिक विशाल गज्जर याने अलिकडेच केलेले संशोधन महत्त्वाचे आहे.’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scientist dr nissim kanekar ncra tifr research work
First published on: 28-09-2017 at 05:04 IST