पुणे : वयाची शंभर वर्षे पूर्ण केलेले ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या कुंचल्यातून आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह साकारले गेले आहे. शि. द. फडणीस यांनी साहित्य संमेलनासाठी साकारलेले हे पहिलेच बोधचिन्ह ठरले आहे. या बोधचिन्हाचे अनावरण १० सप्टेंबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये होणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात शि. द. फडणीस यांच्याच हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण हस्ते होणार असून उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार असून महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांची सन्मानीय उपस्थिती असणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पहिल्यांदाच बोधचिन्ह साकारले असून याचा मनस्वी आनंद आहे.- शि. द. फडणीस

वयाची शतकपूर्ती केलेल्या चित्रकाराने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह साकारण्याची घटना साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच घडत आहे.१०० वर्षांच्या शि. द. फडणीस यांनी ९९ व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार करणे हा संख्यायोग देखील सुंदर आहे.- प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ