पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारात शिरलेल्या चोरट्यांनी चंदनाची सात झाडे कापून नेणाऱ्या चोरट्यांना सुरक्षारक्षकांनी पकडले. चोरट्यांबरोबर असलेले दोन साथीदार पसार झाले आहेत.

या प्रकरणी बाबू ताया लोखंडे (वय ४९, रा. केडगाव, ता. दौंड) आणि सुरेश पाटोळे (वय २८, रा. खुटबाव, चाळोबा वस्ती, ता. दौंड) यांना अटक करण्यात आली आहे. दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत पराग रमेश चिटनवीस (वय ५६, रा. एनसीएल कॉलनी, पाषाण रोड) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडे, पाटोळे आणि साथीदार हे शुक्रवारी (२९ ऑगस्ट) मध्यरात्री राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आवारात शिरले. चोरट्यांनी चंदनाच्या सात झाडांचा बुंधा कापून नेला. रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकांनी चंदन चोरटे लोखंडे, पाटोळे आणि साथीदारांना पाहिले.

सुरक्षारक्षकांनी लोखंडे आणि पाटोळे यांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेले दोन साथीदार अंधारात भिंतीवरुन उडी मारून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे यांनी घटनास्थळी भेट दिली. शहरातील शासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, बंगले, सोसायटीच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी एनसीएल, राजभवन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडल्या होत्या.

चंदनाच्या झाडांचे बुंधे यांत्रिक करवतीचा वापर करुन कापले जातात. मध्यरात्री पाहणी करुन चोरटे चंदनाची झाडे कापून नेतात. चंदनाचा वापर सुवासिक तेल, अत्तरे तयार करण्यासाठी केला जातो. काळ्या बाजारात चंदनाच्या झाडांना मोठी किंमत मोजली जाते. पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड तालुक्यातील चोरट्यांच्या टोळी चंदनाची झाडे कापून नेण्यात तरबेज आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली जाते.