पुणे : राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. यंदा २ लाख ६६ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी ११ हजार ६८२ विद्यार्थ्यांचा कोटा शिष्यवृत्तीसाठी निश्चित केला आहे. राज्याच्या आरक्षणानुसार सातवी, आठवीची विद्यार्थिसंख्या. १२ ते १४ वयोगातील विद्यार्थिसंख्येच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आला आहे.
परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनार्थ ही शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना नववी ते बारावी या चार वर्षांच्या कालावधीत दरमहा एक हजार रुपये या प्रमाणे वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये एनएमएमएस परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २४ डिसेंबर रोजी घेण्यात आली. त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांची माहिती, जात, दिव्यांगत्व, जन्मदिनांक आदींबाबत दुरुस्ती करण्यासाठी मुदत देण्यात आली. या दुरुस्त्या विचार घेऊन शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांची अंतिम निवडयादी जाहीर करण्यात आली. परीक्षेचा निकाल आणि शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांची निवडयादी http://www.mscepune.in/ या संकेतस्थळावरून शाळांना काढून घेता येणार आहे.