पुणे : घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस चोरून तो रिकाम्या टाकीत भरून नागरिकांना जादा दराने विक्री करणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून रिकाम्या टाक्या, टेम्पो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पंकज किसनसिंग ठाकूर (वय २०, सध्या रा. मांजरी, मूळ रा. फतेहबाद, जि. आग्रा, उत्तर प्रदेश), प्रवीण बंगालीराम कुमार (वय ३५, सध्या रा. मांजरी, मूळ रा. फतेहबाद, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वानवडी पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी हडपसर भागातील सूर्यलोकनगरी सोसायटीसमोरील उद्यान परिसरात दोघे जण सिलेंडरमधील गॅस बेकायदा रिकाम्या टाकीत भरत असल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारचे कृत्य धोकादायक असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी अमोल पिलाणे आणि अभिजित चव्हाण यांना मिळाली. पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तेव्हा आरोपी टेम्पोत घरगुती वापरातील गॅस सिलिंडरमधून गॅस रिकाम्या टाकीत बेकायदा भरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ठाकूर आणि कुमार यांना ताब्यात घेतले. दोघे जण हडपसरमधील एका गॅस वितरक एजन्सीत काम करत असल्याची माहिती चौकशीत मिळाली. घरगुती गॅस सिलिंडरमधून प्रत्येकी एक किलो गॅस चोरून तो रिकाम्या टाकीत भरत असल्याची माहिती त्यांनी दिली.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस कर्मचारी दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, यतीन भोसले, विष्णु सुतार, बालाजी वाघमारे, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे यांनी ही कामगिरी केली.