पुणे : एटीएमधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची चोरट्याने ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक धनकवडी भागात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १८ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर असलेल्या एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्या पाठोपाठ एक चोरटा एटीएममध्ये शिरला. एटीएममधून पैसे निघत नाहीत, अशी बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. एटीएममधून पैसे काढून देण्यास मदत करतो, अशी बतावणी करुन चोरट्याने त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडील एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवले. एटीएम वापराचा सांकेतिक शब्द चोरट्याने त्यांच्याकडून घेतला.

चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्डचा वापर करुन पैसे काढण्याचा प्रयत्न केला. एटीएममधून पेैसे निघत नाहीत, असे सांगितले. चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्ड ज्येष्ठाला दिले. पैसे न मिळाल्याने ते एटीएममधून बाहेर पडले. त्यानंतर ज्येष्ठाकडून घेतलेल्या एटीएम कार्डचा गैरवापर करुन चोरट्याने खात्यातून ५० हजार रुपये चोरले. खात्यातून पैसे काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खाडे तपास करत आहेत. एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांकडील रोकड चोरणाऱ्या कर्नाटकातील चोरट्याला पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. चोरट्याने पुणे शहर परिसरात एटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठांकडील रोकड चोरून नेण्याचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.