पुणे : खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वार नागरिकाचा तोल गेला. पाठीमागून आलेल्या मोटारीच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना औंध भागातील नागरस रस्त्यावर घडली.जगन्नाथ काशिनाथ काळे (वय ७३, रा. औंध) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. अपघाताची नोंद चतु:शृंगी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दुचाकीस्वार काळे हे औंध परिसरातील नागरस ररस्त्यावरुन बुधवारी (३० जुलै) दुपारी एकच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यातून दुचाकी गेल्यानंतर त्यांचा तोल गेला आणि ते दुचाकीसह रस्त्यात पडले. त्या वेळी पाठीमागून आलेल्या मोटारीच्या चाकाखाली सापडून काळे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिक, तसेच पोलिसांनी त्यांना जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले, अशी माहिती चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले.दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा खड्ड्यामुळे बळी गेल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

 नागरस रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी अपघाताची घटना टिपली. समाजमाध्यमात अपघाताची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला.पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्ली बोळात खड्डे पडले आहेत. खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून वाहनचालक वाट काढतात. बऱ्याचदा रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने दुचाकीस्वार घसरून पडतात. खड्ड्यांमुळे गंभीर, तसेच किरकोळ दुखापत होण्याच्या घटना घडतात. पावसामुळे खड्डे पडल्याने खड्डयात खडी भरली. मात्र, पावसामुळे खड्ड्यातील खडी बाहेर पडल्याने दुचाकीस्वार घसरुन पडतात. महापालिका प्रशासनाने तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. खड्डे नीट न बुजविल्याने दुचाकीस्वार घसरुन पडतात, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आाहेत.दरवर्षी पावसाळ्यात खड्डयांमुळे दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटना घडतात. गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरात खड्डयांमुळे एका दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

दहा हजार खड्डे बुजविल्याचा पालिकेचा दावा

असमान रस्ते, रस्त्यांवरील खचलेली झाकणे, खड्डे चुकविताना होणारी वाहनचालकांची कसरत या समस्यांचा सामना नागरिकांना आजही करावा लागत असून, महापालिकेने मात्र एक एप्रिलपासून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे. खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पथ विभागाने कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती करून त्यांच्यावर कामाची जबाबदारी निश्चित केली असली, तरी अद्याप रस्त्यांवरील खड्ड्यांचे प्रमाण कायम असल्याचे चित्र आहे. शहरात कमी-अधिक प्रमाणात पडत असलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून, त्यामधून वाहने चालविताना नागरिकांची तारांबळ उडत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. अनेक रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करण्यामध्ये महापालिकेला अपयश आल्याचा आरोप होत आहे. हे चित्र एकीकडे असताना एक एप्रिलपासून आतापर्यंत पथ विभागाने शहरातील १० हजारांपेक्षा अधिक खड्ड्यांची दुरुस्ती केल्याचा दावा केला आहे.पावसामुळे महापालिकेने बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडले असून, त्यामधील खडी बाहेर येत आहे. काही ठिकाणी नव्याने खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे महापालिकेच्या कामाचा दर्जा पुन्हा एकदा समोर आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.