चीनमध्ये सध्या करोनाने हाहाकार माजवला असताना अनेक देशांना करोनाच्या चौथ्या लाटेचा फटका बसला आहे. भारतात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून महाराष्ट्रात तर सर्व निर्बंध उठवण्यात आले असून मास्कसक्तीही करण्यात आलेली नाही. दरम्यान भारतातही करोनाची चौथी लाट येण्याची भीती व्यक्त होत असताना सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पर्यायी इंधनावर चर्चा करण्यासाठी आयोजित परिषदेत अदर पूनावाला यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भारतात जर कधी करोनाची चौथी लाट आली तर ती सौम्य असेल असा विश्वास व्यक्त केला. तसंच देशाने योग्य लस निवडल्यामुळेच आज भारतात करोना रुग्णसंख्या इतकी कमी आहे असंही ते म्हणाले.

बुस्टर डोससंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, “बुस्टर डोससंबंधी आम्ही सरकारला आवाहन केलं आहे. कारण प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला बुस्टर डोसची गरज आहे. सरकारमध्ये सध्या अंतर्गत चर्चा सुरु असून यासंबंधीचं धोरण लवकरच जाहीर केलं जाऊ शकतं”.

सर्व देश बुस्टर डोस देत असताना आता भारतानेही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं अदर पूनावाला यांनी सांगितंल आहे. यावेळी त्यांनी केंद्राचं कौतुक करताना जास्तीत जास्त लोकांना लसीचे दोन्ही डोस पुरवत त्यांनी उत्तम काम केल्याचं म्हटलं.

“इतर देशांच्या तुलनेत आपली लस चांगली असल्याचं सिद्ध झालं आहे. अमेरिका. युरोपकडे पहा…त्यांच्याकडे अनेक रुग्ण आहेत. आपल्याकडे कमी रुग्ण आहेत कारण आपण योग्य लस निवडली,” असं अदर पूनावाला म्हणाले.

लस करोनाच्या नव्या व्हेरियंटवर प्रभावी ठरतील का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “बुस्टर डोस घेतला तरच त्या प्रभावी ठरतील आणि भविष्यातील व्हेरियंटपासूनही सुरक्षित करतील”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतात तज्ज्ञ लसींचं मिश्रण करण्याचा विचार करत असल्याचं अदर पूनावाला यांनी सांगितलं आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कोविशिल्ड लसीची निर्मिती करतं.