पुणे : महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करत जखमी अवस्थेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने जन्मठेपेसह ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश डी. पी.रागीट यांनी हा निकाल दिला. या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्यावर अत्याचार केल्यानंतर आरोपी तिच्या अंगावरील सोने लुटून पसार झाला होता.
राजेश मनीराम यादव (रा. वाकडेवाडी, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना १८ फेब्रुवारी २०१५ रोजी शिवाजीनगर येथील अनुतेज अथर्व सोसायटीत घडली होती. महिला ही घरात एकटीच राहत होती. त्याचा फायदा घेत यादव याने तिच्याशी ओळख वाढविली. घटनेच्या दिवशी महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्या घरी जात मालिश करण्यास सुरुवात केली. यावेळी, त्याने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
त्यास महिलेने विरोध केला असता त्याने रागाच्या भरात तिचे तोंड दाबले. त्यानंतर भाजी कापण्याच्या सुरीने तिच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर त्याने अत्याचार केला. या दरम्यान, महिलेचा मृत्यू झाला. अत्याचारानंतर पळून जात असताना त्याने महिलेची सोन्याची कर्णफुले, चांदीचे पैंजण, मोबाईल संच तसेच तीन हजार रुपये चोरून नेले. दरवाजा उघडा असल्याने शेजारी घरात आले तेव्हा त्यांना महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.
या प्रकरणी महिलेच्या मुलाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याचे कामकाज सरकार पक्षातर्फे लीना पाठक यांनी पाहिले. त्यांनी १६ साक्षीदार तपासले. युक्तिवादादरम्यान वैद्यकीय अहवाल, आरोपीच्या बोटांचे ठसे हा पुरावा महत्त्वाचा ठरला.
आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा युक्तिवाद पाठक यांनी केला. न्यायालयाने मान्य करत आरोपीला जन्मठेपेसह ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. पोलीस हवालदार टी. जी. शेख, ए. आर. कांबळे, एफ. एल. सोनवणे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.