दिल्लीतून बेपत्ता झालेल्या एका तरुणीचा तपास करताना पिंपरी- चिंचवडमध्ये चालणाऱ्या मोठय़ा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. ही तरुणीही याच रॅकेटमध्ये अडकली होती. सांगवी व पिंपळे सौदागर भागात घातलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी १४ तरुणींची सुटका केली असून, त्यांना वेश्या व्यवसायास भाग पाडणाऱ्या १३ दलालांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीत राहणाऱ्या मध्यमवर्ग कुटुंबातील एक तरुणी २५ जूनला बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांना ती पिंपरी- चिंचवडमधील पिंपळे सौदागरमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी या तरुणीचा आई व भाऊ पिंपरीत आले. त्यांनी पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांकडून तातडीने कारवाई सुरू करण्यात आली. पोलिसांनाही या प्रकरणात काही माहिती उपलब्ध झाली. त्यानुसार पिंपळे सौदागर येथे शिवार हॉटेलच्या समोर सापळा लावण्यात आला. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मोटारीवर पोलिसांनी छापा घातला. त्यात तीन तरुणी व दोन दलाल पोलिसांच्या हाती लागले. त्यात दिल्लीतूल बेपत्ता तरुणीचाही समावेश होता.
छाप्यात पकडलेल्या दलालांकडून मिळालेल्या माहितीनंतर संपूर्ण सेक्स रॅकेटचा उलगडा झाला. पोलिसांनी बुधवारी रात्री सांगवी व पिंपळे सौदागर भागात विविध ठिकाणी छापे टाकले. त्यातून इतर तरुणींची सुटका करण्यात आली. त्याचप्रमाणे काही दलालांनाही अटक करण्यात आली. दिवेश राम महंतो (वय ३३, रा. थेरगाव, मूळ रा. आसाम), अजय लोकबहाद्दूर गिरी (वय १९), गणेशदल बहाद्दूर छत्री (वय ३३, रा. आसाम), दीपक किरण छत्री (वय २६, रा. आसाम), सुजीतकुमार गोपाल बाकुडा (वय ३२, रा. कर्नाटक), प्रकाश पन्नालाल चौधरी (वय २४, रा. राजस्थान), प्रफुल्ल भास्कर बेंद्रे (वय २८, रा. पाथर्डी, अहमदनगर), सुजत जैकब मॅथ्यू (वय ३०, रा. केरळ), ए. बी. थॉमस (वय ३३, रा. केरळ) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2013 रोजी प्रकाशित
दिल्लीतील बेपत्ता तरुणीला शोधताना पिंपरीतील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश ; १४ तरुणींची सुटका
दिल्लीतून बेपत्ता झालेल्या एका तरुणीचा तपास करताना पिंपरी- चिंचवडमध्ये चालणाऱ्या मोठय़ा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला.
First published on: 09-08-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sex racket in pimpri opened while searching lost girl from delhi