पुणे : ‘आपल्या देशामध्ये गोवंश हत्येवर बंदी आहे. भविष्यात यमाचे वाहन म्हणून रेड्याच्या हत्येवर बंदी येऊ शकेल. सध्याचा काळच असा आहे की मत्स्यावतार, वराह अवतार म्हणून त्या त्या पशू-पक्ष्याच्या हत्येवर बंदी आली, तरी आश्चर्य वाटणार नाही, अशी टिप्पणी ‘दलित किचन ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाचे लेखक शाहू पाटोळे यांनी रविवारी केली.विचारवेध असोसिएशन आयोजित सहाव्या विचारवेध संमेलनात शाहू पाटोळे यांच्याशी अनुवादक भूषण कोरगावकर यांनी संवाद साधला. त्यावेळी पाटोळे बोलत होते.

‘अमूक अन्न खाल्याने तमुक धर्माचा अपमान होतो, हे खोटे आहे. सगळे हिंदू शाकाहारी नाहीत. मांसाहार चांगला आहे, याचा प्रचार करावा लागत नाही. पण, शाकाहार चांगला आहे,हे सांगावे लागते, हे लक्षात घेतले पाहिजे. खाद्यसंस्कृती धर्माशी जोडणे चुकीचे आहे, असे मत पाटोळे यांनी व्यक्त केले.पाटोळे म्हणाले, ‘पूर्वापारपासून सर्वजण ‘ अन्न हे पूर्ण ब्रह्म’ ऐकत आल्यामुळे ‘ अन्न हे अपूर्ण ब्रह्म’ हा शब्दप्रयोगच लक्षात घेतला जात नाही. हे पुस्तक वाचणाऱ्या परदेशातील वाचकांना हिंदू मांसाहार करतात, यावर विश्वास बसत नाही. यात लपविण्यासारखे काय आहे? अमूक अन्न खाल्याने तमुक धर्माचा अपमान होतो,हे खोटे आहे. खाद्यसंस्कृतीप्रमाणेच भाषा संस्कृतीदेखील असते.

प्रमाण मराठी भाषेपेक्षा आमची मराठी अधिक समृद्ध आहे, असे मी सांगू शकतो.’आहारात बदल होत राहणार. ती अपरिहार्य प्रक्रिया आहे.पण, सक्तीने हे बदल होऊ नयेत. संस्कृती सुटी-सुटी नसते. खाद्य हे आपल्याकडे धर्माशी जोडले गेले आहे. प्रत्यक्षात खाद्यवैविध्य अनेक इतर घटकांशी जोडलेले आहे. जात, वर्ण व्यवस्था जितक्या जास्त, तितक्या खाद्य संस्कृती अधिक, हे लक्षात घेतले पाहिजे. भाषेत जातीय, वर्णीय भेद आहेत,तसे खाद्यातही भेद आहेत. हे भेद उतरंडीनुसार वरून खाली आले आहेत. कोणी काय खावे,हे सरकारने ठरवू नये. मांसाहारासारखे विशिष्ट आहार वाईट आहे, अशी अंधश्रद्धा पसरवली जात आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी पाणी, तुषार सिंचन, कीटकनाशक आल्याने रानभाज्याही जवळपास संपुष्टात आल्या आहेत, असे निरीक्षणही पाटोळे यांनी नोंदवले.कोरगावकर म्हणाले, ‘भाषा ही एका वर्गाच्या हातात गेल्याने अनेक गोष्टी लपून राहिल्या. दलित, आदिवासी, ख्रिश्चन, भटके असे सगळ्यांचे शब्द, पाककृती साहित्यात आले पाहिजे. ‘अन्न हे अपूर्ण ब्रह्म’चे इंग्रजी भाषांतर करताना काम सोपे नव्हते.’