शैलेन्द्र परांजपे

जयंत नारळीकर यांना पंचविशीत पद्मभूषण मिळाले, ते त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या संशोधनामुळे… तत्कालीन राष्ट्रपतींनी त्यांना ‘स्टेट गेस्ट’ म्हणून निमंत्रित करून त्यांचे संशोधन सोप्या भाषेत भारतीयांपर्यंत पोहोचावे, यासाठी देशातील प्रमुख शहरांत त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सरांची ओळख जगाला आहे. पण, मला त्यांच्यातील काही गोष्टी जवळून बघायला मिळाल्या, त्या विविध प्रसंगांमधून. त्यातलेच काही उद्धृत करतो.

प्रसंग १

‘आयुका’मध्ये आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या सुटीच्या महिन्यात आठवडाभराचा वर्ग घेतला जात असे. आठवडाभराचा म्हणजे वर्किंग पाच दिवस – सोमवार ते शुक्रवार. शालेय विद्यार्थ्यांना खगोलविज्ञानामध्ये रस निर्माण व्हावा, या हेतूने हे वर्ग घेतले जात. त्या वर्गात तीसेक विद्यार्थी असत आणि या वर्गाचे आकर्षण म्हणजे पाचव्या दिवशी चहापानाच्या ब्रेकला स्वतः जयंत नारळीकर सर या मुलांशी गप्पागोष्टी करायला उपस्थित राहायचे.

गप्पा मारता मारता सर या आठवीतल्या मुलांना एखाद-दोन विज्ञान कोडी घालायचे. त्याद्वारे त्यांच्या मनात विज्ञान, गणित, खगोलशास्त्र या सर्वांविषयी अपार कुतूहल निर्माण होईल, याचे बीज रोवायचे. हे मी अनेकदा जवळून बघितले आहे. अशाच एका वर्गात त्या आठवीतल्या मुलांना त्यांची नावे सर विचारत होते. प्रत्येक मुलगा वा मुलगी आपापले नाव सांगत होते. अचानक एका छोट्याशा मुलाने स्वतःचे नाव सांगितले आणि तो म्हणाला, ‘मी माझे नाव सांगितले, पण तुमचे नाव काय आहे?’

अशा प्रश्नानंतर मोठ्या व्यक्तींच्या काय प्रतिक्रिया होतील, सांगता येत नाही. पण अगदी लहान मुलाप्रमाणे नारळीकर सरांनी आपली जीभ चावली आणि ‘अरे! सॉरी हं, माझं नाव सांगायचंच राहिलं. मी जयंत नारळीकर. इथे ‘आयुका’त काम करतो’ इतकेच सांगितले…

त्या मुलांबरोबर चहा घेतानाही सर रांगेत उभे राहायचे आणि नकळत एक संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे.

प्रसंग २

‘आयुका’च्या आवाराला लागूनच ‘एनसीआरए’ म्हणजे नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेचे आवार आहे. दोन्ही संस्थांचे कंपाउंड समाईक आहे. त्या संस्थेच्या सभागृहात नव्वदच्या दशकात पाच ते सहा अग्रगण्य संशोधक एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार होते. त्यासाठी नारळीकर सरही होतेच आणि ते वेळेचे पक्के असल्याने पत्रकार परिषद वेळेवर सुरू होणार हे माहीत होते. त्यामुळे चारच्या वीस मिनिटे आधी मी पोहोचलो. त्या संस्थेच्या आवारात सुरक्षारक्षकाने नोंदवहीत नोंद करायला सांगितली. ती करत असतानाच दाराच्या बाजूने शांतपणे नारळीकर सर चालत आत जात होते. सुरक्षारक्षकाने नारळीकर सरांना उद्देशून हटकले आणि आत कसे काय चाललात, अशी विचारणा केली. मी त्या गार्डला काही सांगणार, इतक्यात सरांनी हातानेच मला खूण करत थांबवले आणि म्हणाले, ‘त्यांची काही चूक नाही. मीच नोंद करून जायला हवे.’ सरांनी शांतपणे माझ्यानंतर नोंदवहीत अभ्यागतांच्या यादीत आपले नाव आणि येण्याचा हेतू लिहिला आणि ते शांतपणे पत्रकार परिषदेसाठी चालत आत आले. सुरक्षारक्षकाला एव्हाना ही व्यक्ती कोणी तरी मोठी आहे, हे जाणवले होते. पण सरांनी शांतपणे नोंद केली आणि ते आत गेले.

प्रसंग ३

आकाशवाणीसाठी नारळीकर सरांची मुलाखत युवकांच्या कार्यक्रमासाठी घेतली होती. त्यासाठी पन्नास एक प्रश्न काढून सरांना दाखवले होते. पण, युवकांना प्रेरित करण्यासाठी नेतृत्वगुण कसे शिकलात, बालपण कसे होते, अशा गोष्टी आकाशवाणीच्या निर्मात्यांना अभिप्रेत होत्या. त्यामुळे त्यांनी माझे खगोलविज्ञानाचे प्रश्न बाजूला काढून ठेवले. मी खट्टू झालो आणि सरांना पुन्हा भेटलो. मी म्हणालो, ‘सर, तुमचे बालपण किंवा आवडीनिवडी विचारायला विज्ञान कव्हर करणाऱ्या पत्रकाराची काय गरज आहे?’ सर हसत म्हणाले, ‘अहो, विज्ञान प्रसार करायचा असेल तर असं चिडून चालत नाही. आकाशवाणी सरकारी माध्यम आहे. तुम्ही मुलाखत घेत नाही म्हणालात, तर दुसरे कोणी घेईल. पण, तुम्ही आणि मी ठरवून मुलाखतीत दोन-तीन प्रश्न विज्ञानाचे घेऊ आणि ते सगळे बरोब्बर तेरा मिनिटांत बसवू म्हणजे झालं. सरकारी माध्यमात किमान तीन मिनिटे का होईना, विज्ञान देऊ शकू, हा विचार करा.’

प्रसंग ४

दूरदर्शनसाठी ‘शिलेदार राष्ट्रनिर्मितीचे’ या सदरात नारळीकर सरांची मुलाखत मी घेतली. त्या वेळी दूरदर्शनच्या पुणे केंद्रातील चोपडे सर यांना तनुजा वाडेकर यांनी माझे नाव सुचवले. त्यामुळे नारळीकर सर आणि विजय भटकर सर यांची स्वतंत्र मुलाखत मी घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलाखतीचे रेकॉर्डिंग झाले आणि सर दूरदर्शनच्या मोटारीने घरी जायला निघाले. त्या वेळी दारापर्यंत सोडायला आलेल्या संचालक चोपडे यांना सर म्हणाले, ‘ही मुलाखत चांगली झाली आहे; तेव्हा याचे रेकॉर्डिंग जपून ठेवा. माझे वय लक्षात घेता, यानंतर मी टीव्हीच्या स्टुडिओत येईन की नाही, याची शंका वाटते.’ त्यावर चोपडे यांनी सरांची इंग्लंडहून भारतात परतले त्या वेळची मुलाखत मुंबई दूरदर्शनकडे आहे, अशी आठवण करून दिली. त्यावर नारळीकर सर त्यांच्या मिश्कील शैलीत उत्तरले, ‘त्या टेपवर अन्य काही तरी महत्त्वाचे टेप करावे लागले होते. त्यामुळे ती मुलाखत उपलब्ध नाही, अशी माझी माहिती आहे.’ सर माझ्याकडे बघून हसले आणि त्या विनोदाला दाद देणे संचालकांसमोर शक्य नसल्यामुळे मी हसत हसत पटकन् तेथून निघालो. (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, डॉ. नारळीकर यांचा सहवास त्यांना लाभला आहे.)