पुणे : ‘राज्याच्या इतिहासाची तथाकथित विचारवंतांकडून मोडतोड होत असताना ज्यांनी इतिहासाचे वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये ज्येष्ठ इतिहासकार डाॅ. आ. ह. साळुंखे आणि डाॅ. जयसिंग पवार यांचा मोठा वाटा होता,’ या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी या दोघांचा गौरव केला.

मुळशी येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे आणि इतिहास संशोधक, विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांना ‘शिवस्वराज्यभूषण पुरस्कार’ बुधवारी शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार छत्रपती श्री शाहू महाराज, सुप्रिया सुळे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, सौ. वसुधा पवार, प्रवीण गायकवाड, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, डॉ. श्रीमंत कोकाटे, आयोजक सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार यावेळी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘महाराष्ट्राचा इतिहास मांडला जात असताना काही तथाकथित विचारवंतांकडून मोडतोड होत होती. अशा वेळी काहीजण वास्तव इतिहास मांडण्याचे काम करत होते. त्यामध्ये पवार आणि साळुंखे यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर ठेवला. त्यांचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून आणि तोही स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असलेल्या मुळशीच्या भूमीत होत आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. छत्रपतींचे स्वराज्य हे रयतेचे राज्य होते. राज्यात अनेक राजे होऊन गेले. मात्र, लोक आता त्यांना विसरले. पण, हिंदवी स्वराज्य लोकांच्या हृदयावर आजही राज्य करीत आहे.’

‘तत्कालीन काळातील जगात सर्वत्र धार्मिकतेवर आधारित राज्य होती, हे लक्षात घेतल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हे राज्य रयतेचे’ या विचारांचे महत्त्व लक्षात येते. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे, म्हणजेच राजेशाहीचे नाव आपण लोकशाहीतही घेतो. कारण त्यांनी दाखवलेला सर्वधर्मसमभाव हा आपल्या घटनेचा प्राण आहे,’ असे डाॅ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले. ‘हा पुरस्कार म्हणजे मोठी जबाबदारी आहे. ती आम्ही पार पाडू. हा क्षण गौरवाचा आहे,’ असे डाॅ. आ. ह. साळुंखे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सुप्रिया सुळे पक्षाचे नेतृत्व करतील’

‘शिवरायांपासून स्फूर्ती घेऊन सह्याद्री प्रतिष्ठान काम करीत आहेत. आजच्या एकूण परिस्थितीला दिशा देण्याचे काम हा कार्यक्रम करील. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे पुरोगमित्व राखण्यासाठी अशा विचारवंतांचा गौरव होणे गरजेचे आहे. खासदार सुळे नुकत्याच परदेशाचा दौरा करून आल्या. तिथे त्यांनी भारताची बाजू प्रभावीपणे मांडली. त्या आता पक्षाचे नेतृत्व करतील, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही,’ अशा शब्दांमध्ये शाहू महाराज यांनी खासदार सुळे यांचे कौतुक केले. अनिल पवार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन चेतन कोळी यांनी तर महेश मालुसरे यांनी आभार मानले.