पिंपरी : ‘सत्तेसाठी भाजपबरोबर जाऊन बसायचे ही भूमिका कोणी मांडत असेल, तर हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा; पण भाजपशी ठेवू नका. भाजपशी संबंध ठेवणारा काँग्रेसच्या विचाराचा असू शकत नाही. काही लोक गेले, त्यांची चिंता करू नका,’ अशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा संकल्प मेळावा मंगळवारी ताथवडे येथे झाला. त्या वेळी पवार बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, अरुण बोऱ्हाडे, रविकांत वर्पे, सुनील गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख या वेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘अनेक जण वेगवेगळ्या विचारांमध्ये विभागले आहेत. सर्वांना बरोबर घ्या, असे म्हटले जाते. पण, सर्व म्हणजे कोण? फुले-शाहू-आंबेडकर, गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचा विचार हा जर सगळे म्हणत असतील, तर मला मान्य आहे. सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचे, ही भूमिका कोणी मांडत असेल, तर हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा. पण, भाजपशी संबंध ठेवू नका. भाजपशी संबंध ठेवणारा काँग्रेसच्या विचाराचा असू शकत नाही.’
‘संधिसाधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही. त्या दृष्टिकोनातून पावले टाकायची नाहीत,’ अशा सूचना कार्यकर्त्यांना करून ते म्हणाले, ‘पक्ष सोडून गेले, त्यांची चिंता करू नका. नवीन लोक आहेत. अशा गोष्टी मी आयुष्यात अनेकदा अनुभवल्या आहेत. १९७८ मध्ये मुख्यमंत्री झालो, १९८० मध्ये सरकार बरखास्त झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ७० आमदार निवडून आले. दोन महिन्यांनी काही कामासाठी मी इंग्लंडला गेलो, तर दहा दिवसांत राज्यात चमत्कार झाला. ७० पैकी ६४ आमदार सोडून गेले. मला आश्चर्य वाटले. लोकांनी पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले. मी चिंताग्रस्त झालो नाही. लोकांशी संपर्क वाढविला. पाच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत जे सोडून गेले, त्यांतील ९० टक्के लोकांचा पराभव झाला. ७१ जण विधानसभेत निवडून आले. त्यामुळे कोण आला, गेला याची काही चिंता करू नका. लोक हुशार आहेत. देशाची लोकशाही सामान्य माणसाच्या सामुदायिक शहाणपणामुळे टिकली आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, अशा प्रकारची कामगिरी करायची आहे. त्यासाठी संघटन मजबूत असले पाहिजे.’
‘गडबड झाल्याने पालिकेत भाजपची सत्ता’
‘महापालिका निवडणुकीत महिला, तरुणांना संधी दिली जाईल. प्रत्येक प्रभागात नवीन नेतृत्व तयार केले जाईल. पिंपरी-चिंचवड महापालिका अनेक वर्षे काँग्रेसच्या विचारांकडे होती. मध्यंतरी गडबड झाली आणि भाजपची सत्ता आली. हे चित्र बदलायचे आहे. विकासाच्या कामाला गती द्यायची आहे. शहराचा लौकिक कायम ठेवायचा आहे. या पक्षाला भविष्य आहे की नाही, असे लोकांना वाटत होते. पण, कठीण काळात अनेक कार्यकर्त्यांनी अस्वस्थ परिस्थितीत पक्षाचा झेंडा हाती घेतला. पक्ष पुन्हा मजबुतीने उभा करण्याचा निर्धार केला आहे. हा कार्यकर्त्यांचा, नेतृत्वाचा संच सर्वांसोबत आहे. या संघटनेच्या जोरावर पुढे जायचे आहे,’ असे शरद पवार म्हणाले.
शहराची विभागणी झाली आहे. नदीच्या, रस्त्याच्या पलीकडे आणि अलीकडे अशी शहराची वाटणी झाली आहे. हा नवीन व्यवसाय राजकारणात सुरू झाला आहे. हे स्वच्छ करायचे आहे. नदीसह शहरातील नेतृत्वाबाबतचे चित्र स्वच्छ करायचे आहे. त्यासाठी शहरात मी अधिक लक्ष घालणार आहे. शरद पवार