पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यापार वाढत आहे. बाजार आवारातील दैनंदिन व्यवहार आणि व्यापारासाठी जागा अपुरी पडत आहेत. मार्केट यार्डातील व्यापार भविष्यात वाढणार असल्याने व्यापाऱ्यांनी स्थलांतराबाबत सकारात्मक भूमिक घ्यावी. मार्केट यार्डातील नवीन जागेसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि राज्य शासनाशी चर्चा करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांनी प्रस्तावित जागेबाबत विचार करावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली.

दी पूना मर्चंट्स चेंबरच्या ‘वाणिज्य विश्व’ सुवर्णमहोत्सवी अंकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक डाॅ. निलेश खरे, उद्योजक विठ्ठल मणियार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका,, दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, वाणिज्य विश्वचे संपादक प्रवीण चोरबेले, सहसंपादक आशिष दुगड, सहसचिव ईश्वर नहार आदी उपस्थित होते. ‘वाणिज्य विश्व’चे पहिले संपादक स्व. ईश्वरदासजी चोरडिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य ‘व्यापारी मित्र’चे पुरुषोत्तमजी शर्मा, रूरल रिलेशन्स संस्थेचे संस्थापक प्रदीप लोखंडे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राध्यापक. डॉ. संजय कंदलगावकर यांना ‘वाणिज्य रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला, तसेच सुभाष किवडे आणि दिलीप साळवेकर यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. बीएमसीसी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली.

हेही वाचा >>>पुणे: प्रवाशांसाठी खूशखबर! पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास होणार वेगवान

काही वर्षांपूर्वी मार्केट यार्डातील भुसार बाजार शहराच्या नाना-भवानी पेठेत होता. मध्यभागातील जागा अपुरी पडत होती. त्यामुळे गुलटेकडी भागात भुसार बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या वेळी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला होता. आता मार्केट यार्डातील व्यापार वाढला आहे. भविष्याचा विचार करुन मार्केट यार्डातील भुसार बाजारासाठी नवीन जागा शोधणे गरजेचे आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी सकारात्मक भूमिक घ्यावी. नवीन जागेसाठी आपण पीएमआरडीए आणि राज्य शासनाशी चर्चा करण्यात येणार आहे, असे पवार यांनी नमूद केले.

हेही वाचा >>>शरद पवारांचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर; पाटण्यातील बैठकीचा उल्लेख करत म्हणाले, “मी कधीच…”!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वाणिज्य विश्व’ अंक व्यापार क्षेत्रातील घडामोडींचा वेध घेणारा अंक आहे. शैक्षणिक, व्यापार, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे आघाडीवर आहे. महत्वाचे उद्योग पुण्यात आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात तीन ते साडेतीन लाख कर्मचारी आहेत. देशभरातील नागरिक पुण्यात नोकरी, व्यवसायासाठी येतात. भविष्यात पुण्याचे स्थान कायम आघाडीवर राहणार आहे. दी पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष कै. बाबा पोकर्णा यांनी कायम व्यापारहित डोळ्यासमाेर ठेऊन काम केले. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर पोकर्णा यांनी भूमिका मांडली, असे पवार यांनी सांगितले.निलेश खरे, विठ्ठल मणियार यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र बाठिया यांनी प्रास्ताविक केले.