पिंपरी : पिंपरी पालिकेचे नवे आयुक्त शेखर सिंह यांनी गुरूवारी (१८ ऑगस्ट) सायंकाळी पदभार स्वीकारला. यावेळी महापालिकेचे मावळते प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ व उल्हास जगताप यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. त्यानंतर, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पाटील यांची बदली रद्द झाल्याच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजेश पाटील यांची मंगळवारी (१६ ऑगस्ट) बदली झाली. पाटील यांची कार्यपध्दती, निर्णयप्रक्रियेत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेला कल व भाजपची तीव्र नाराजी यासारख्या कारणांमुळे १८ महिन्यांतच त्यांना बदलीला सामोरे जावे लागले. शेखर सिंह नवे आयुक्त असतील, हे मंगळवारी दुपारीच स्पष्ट झाले होते. मात्र, गुरूवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी सूत्रे स्वीकारली. या दरम्यानच्या काळात राजेश पाटील यांच्या बदलीला स्थगिती मिळाल्याची जोरदार चर्चा शहरभर पसरली होती. नवे आयुक्त बुधवारी पदभार स्वीकारतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, तसे झाले नाही. ते बुधवारी सायंकाळनंतर शहरात दाखल झाले. त्यांची मुक्कामाची व्यवस्था भोसरीजवळ ‘सीआयआरटी’च्या विश्रामगृहात करण्यात आली होती. शहरात असूनही ते गुरूवारी सायंकाळपर्यंत पालिकेत आले नाही. दुसरीकडे, राजेश पाटील व त्यांचे अतिशय निकटवर्तीय असलेले अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हे दोघेही मुंबईत होते. बदली रद्द करण्यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत होते. शेखर सिंह यांना रूजू होण्यास झालेला उशीर आणि पाटील-ढाकणे यांची तातडीची मुंबईवारी, यावरून बदली रद्द होण्याविषयीची चर्चा दिवसभर सुरूच राहिली. अखेर, सायंकाळी शेखर सिंह पालिकेत आल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shekhar singh took charge as new pcmc chief pune print news zws
First published on: 18-08-2022 at 21:51 IST