शिरुर : शिरुर येथील कारेगावात शेततळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला, तर दोघांचे प्राण वाचविण्यात यश आले. सोमवारी कारेगावजवळीत बाभुळसर येथे असलेल्या शेततळ्यामध्ये ही दुर्घटना घडली. अनमोल उर्फ बाबू प्रवीण पवार (वय १३) आणि कृष्णा उमाजी राखे (वय ८, रा. दोघेही कोहकडे हॉस्पिटलजवळ, कारेगाव, शिरूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. प्रदीप रामराव पवार (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल, कृष्णा आणि अनमोलचा भाऊ आदेश (वय १४), स्वराज गौतम शिरसाठ (वय १३) हे चौघेजण सोमवारी सायंकाळी शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले होते. बुडू लागल्यावर चौघांनी आरडाओरड केली. त्यावेळी त्या ठिकाणी क्रिकेट खेळणारे ऋषिकेश नवले आणि दीपक राठोड यांनी पाण्यात उड्या मारून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर तेथे खेळत असलेल्या सलमान शेख, धनंजय गावडे, स्वप्निल नवले, किरण चव्हाण, नाना सोनवणे, महेश पोटघन या तरुणांनी चौघांना रुग्णालयात दाखल केले. तरुणांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे दोघांचे प्राण वाचले. मात्र, अनमोल आणि कृष्णा यांचे निधन झाले. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आगलावे तपास करीत आहेत.
कुटुंब कामानिमित्त कारेगावात
प्रवीण पवार हे मूळचे यवतमाळ येथील असून काही वर्षांपूर्वी कामानिमित्त ते कारेगाव एमआयडीसीत आले. एका कंपनीत ते काम करतात. त्यांना आदेश आणि अनमोल ही दोन मुले होती. या दुर्घटनेत अनमोल याचा मृत्यू झाला. उमाजी राखे हे मूळचे नांदेडमधील असून रोजगारानिमित्त ते कारेगाव परिसरात आले. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. या दुर्घटनेत कृष्णा याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.