शिरूर : शिरूरमधील जांबूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे या परिसरात घबराट पसरली आहे. भागुबाई रंगनाथ जाधव (वय ७२) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. शिरूर तालुक्यात आतापर्यंत दहा जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास जांबुतमधील थोरातवस्ती येथे राहणाऱ्या भागुबाई या लघुशंकेसाठी घराबाहेर पडल्या असताना बिबट्याने हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात ओढून नेले. त्या घरात न आल्याने त्यांच्या मुलाने शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह घरापासून पाचशे मीटर अंतरावर सापडला.

‘जांबुत येथे बिबट्याला पकडण्यासाठी १४ पिंजरे लावण्यात आले आहेत. पिंपरखेड परिसरात मागील आठ दिवसांत ३ बिबटे आणि टाकळी हाजी येथे एक असे चार बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत,’ असे तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी सांगितले. दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी पिंपरखेड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे या साडेपाच वर्षांच्या बालिकेचे निधन झाले. त्यानंतर आता ज्येष्ठ महिलेच्या मृत्यूमुळे या परिसरात घबराट पसरली आहे. यापूर्वी पिंपरखेड, जांबुतमधील समृद्ध सचिन जोरी, पूजा भगवान नरवडे, पूजा जालिंधर जाधव, मुक्ताबाई भाऊ खाडे, इनामगाव येथील लक्ष्मीबाई बबन भोईटे, टेंभेकर वस्ती येथील शिवतेज टेंभेकर, वश सिंग आणि रक्षा निकम यांना बिबट्यांच्या हल्ल्यात प्राण गमवावा लागला आहे.

बिबट्यांचा वावर वाढला

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, जांबुत, टाकळी हाजी; तसेच मांडवगण फराटा, इनामगाव या परिसरात बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर असतो. मात्र, मागील काही वर्षांपासून शिरूर तालुक्यातही बिबटे आढळून येत आहेत. पूर्वी शिरूर तालुक्यातील जांबूत, पिंपरखेड, टाकळी हाजी, फाकटे, कवठे येमाई या बेट भागात बिबट्याचा वावर असायचा. आता मांडवगण फराटा, वडगाव रासाई, पिंपळसुटी, इनामगाव, न्हावरा या पूर्व भागातही बिबटे आढळून येत आहेत.

शिरूर तालुक्यात डिंभे आणि चासकमान कालव्यांमुळे बागायती क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये उसाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. भक्ष्य न मिळाल्यास बिबटे मानवी वस्तीकडे येऊन हल्ले करू लागले आहेत. त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.