पुणे: ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला धडा शिकविणार आहेत. पण, कधी हेच समजत नाही. ते पाकिस्तानला कसा धडा शिकवतील, याची काळजी आम्हालाच आहे,’ असा चिमटा काढून, ‘पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही दुःख आणि चिंता दिसत नाही,’ असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला.
खासदार संजय राऊत पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप तसेच पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर त्यांनी टीका केली. ‘पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान मोदी तत्काळ बिहारला गेले. तेथील प्रचारात सहभागी झाले. पंतप्रधान देशभरात टंगळमंगळ करत फिरत आहेत. मुंबईत नऊ तास नट-नट्यांसोबत हास्यविनोद करत आहेत. आंध्र प्रदेशचे नेते पवन कल्याण यांच्याबरोबर हास्यविनोद करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची एक लकेरही दिसली नाही,’ असे राऊत यांनी नमूद केले.
‘गेल्या दहा वर्षांत जे दहशतवादी हल्ले झाले, ज्या घटना घडल्या, त्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा का मागण्यात आला नाही, ते अद्यापही त्या पदावर का आहेत,’ असा प्रश्न उपस्थित करून, विरोधकांनी अद्यापही त्यांच्या राजीनाम्याची मागणी न केल्याने आपल्याला विरोधकांची कीव वाटते, असेही राऊत म्हणाले.
‘युद्ध सुरू आहे पण…’
युद्ध सुरू झाले आहे. पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्यात आले आहेत. घाबरून नेते आणि दहशतवादी पाकिस्तान सोडून पळाले आहेत, पण हे सर्व माध्यमांत सुरू असल्याची उपरोधिक टीका खासदार संजय राऊत यांनी केली. यापैकी प्रत्यक्षात काहीच झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘पंतप्रधान मुंबईत नऊ तास घालवतात. उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करतात,’ असेही ते म्हणाले.