पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (शिंदे) गुरुवारी एकाच दिवशी दोन स्वतंत्र मेळावे झाले. या मेळाव्यांची चर्चा मात्र शिवसेनेच्या वर्तुळात रंगली.
पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीची आढावा बैठक शहर कार्यालयाकडून गुरुवारी निश्चित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. हा मेळावा शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी शिवसेना नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नवीन सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.
‘शिवसैनिकांनी सत्तेमध्ये असल्याचा फायदा घेऊन विकासाचे दूत म्हणून काम करावे. शिंदे सरकारने महिलांसाठी आनंदाचा शिधा, लाडकी बहीण यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. सत्तेत असून निष्क्रिय राहिलो तर जनतेचा विश्वास डळमळीत होईल. त्यामुळे प्रत्येक प्रभागात सक्रिय राहून शिवसेनेच्या विचारसरणीचा प्रसार करणे आवश्यक आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन संघटनेला बळकट करावे,’ असे डाॅ. गोऱ्हे यांनी सांगितले.
दरम्यान, या मेळाव्यानंतर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातही सायंकाळी मेळावा झाला. शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे, शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुलभा उबाळे यांच्यासह डाॅ. नीलम गोऱ्हेही या मेळाव्याला उपस्थित होत्या. या दोन स्वतंत्र मेळाव्यांची चर्चा शिवसैनिकांमध्येच रंगल्याचे दिसून आले.