पुणे : शिवाजीनगर एसटी स्थानक मूळ जागीच उभारले जाणार आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण केले जाईल. एकात्मिक विकास आराखड्यानुसार हे काम करण्याचे नियोजन आहे. याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मेट्रो आणि महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची बैठकही झाली आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. यावर मंत्री भुसे म्हणाले की, शिवाजीनगर एसटी स्थानकाची जागा सुमारे चार एकर आहे. त्यापैकी एक एकर जागेत भूमिगत मेट्रो स्थानक बांधण्यात आले आहे. यासाठी मेट्रो आणि एसटीमध्ये २०१९ मध्ये सामंजस्य करार झाला होता. यानुसार डिसेंबर २०१९ मध्ये मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाले. शिवाजीनगर एसटी स्थानक तात्पुरत्या स्वरूपात वाकडेवाडी येथील शासकीय डेअरीच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले होते. मूळ स्थानकापासून ते सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे.

हेही वाचा >>> “न्यायाधीशही सुट्टी घेताना अर्ज करतात, मग मंत्री कुणाला न सांगता पळून कसे गेले?”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रोच्या भूमिगत स्थानकाचे काम ३१ मे २०२२ रोजी पूर्ण झाले. त्याचवेळी समांतर पद्धतीने बस स्थानकाचे काम सुरू व्हायला हवे होते. सामंजस्य करार करताना हे कशा पद्धतीने करायचे आणि त्यात कुणाचा किती हिस्सा असेल, याबाबत निर्णय झाला होता. याबाबत मेट्रो आणि एसटी महामंडळामध्ये याबाबत २ नोव्हेंबर २०२२, २६ डिसेंबर २०२२ आणि अखेरीस मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली यंदा ३ फेब्रुवारीला बैठक झाली आहे. शिवाजीनगर एसटी स्थानक मूळ जागीच दोन वर्षांत उभे राहणार आहे. एकात्मिक विकास आराखड्यानुसार हे काम करण्याचे नियोजन आहे, असे भुसे यांनी सांगितले. शिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडी येथून मूळ ठिकाणी शिवाजीनगर येथे स्थलांतरित करण्याबाबत लक्षवेधी सूचनेद्वारे आमदार शिरोळे यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, मेट्रोच्या कामामुळे शिवाजीनगर येथील एसटी स्थानक हे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वाकडेवाडी येथे २०१९ पासून तीन वर्षांसाठी स्थलांतरित करण्यात आले आहे. शिवाजीनगर एसटी स्थानकाची जागा महामेट्रोने घेताना दोन्ही विभागांमध्ये सामंजस्य करार झाला होता. या करारानुसार महामेट्रोने एकात्मिक विकास आराखड्यानुसार एसटी स्थानक बांधून देण्याचे ठरले होते. सध्या महामेट्रोचे काम पूर्ण झाले आहे परंतु, करारानुसार बस स्थानकाचे काम सुरु झालेले नाही. एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्यामुळे त्यांना पुन्हा बस स्थानक बांधणे अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे महामेट्रोने करारानुसार स्थानक बांधून द्यावे.