शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. “”नवनीत राणा या अभिनेत्री आहेत. त्या चांगला अभिनय करतात. सध्या त्या अभिनयच करत आहेत. त्यांना राजकारणाचा सिनेमा करायचा आहे,” असं म्हणत त्यांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केला. तसेच अशी फडतूस माणसं आपण कोण आहोत याचा विचार न करता बोलतात, अशी टीकाही केली. त्या पुण्यात शिवसेना संपर्क मेळाव्याला आल्या असताना टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “नवनीत राणा या अभिनेत्री आहेत. त्या चांगला अभिनय करतात. सध्या त्या अभिनयच करत आहेत. त्यांना राजकारणाचा सिनेमा करायचा आहे. त्या खासदार आहेत. मात्र, त्या जनतेचे प्रश्न सोडवायचं सोडून अशाप्रकारची बेफाम वक्तव्ये करू शकतात. त्यांनी त्या काय आहेत याचा विचार केला पाहिजे.”

“कावळ्याच्या शापाने गाई मरत नसतात”

“कावळ्याच्या शापाने गाई मरत नसतात. आपण कोण आहोत, काय आहोत याचा विचार न करता कोणीही फडतूस माणसे अशाप्रकारची वक्तव्ये करत असतील तर त्याचा विचार करायला हवा,” असं मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं.

“…तर मी हुतात्मा चौकात येऊन दिलगिरी व्यक्त करेल”

नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणारच आहे. याबाबत आमचा अंदाज चुकला तर मी हुतात्मा चौकात येऊन दिलगिरी व्यक्त करेल. मी आव्हान देते की जे आज बोलत आहेत त्यांनी महापालिकेवर भगवा झेंडा फडकल्यानंतर हुतात्मा चौकात येऊन दिलगिरी तर व्यक्त करावीच, पण सोबत सहा महिने जनतेची जी दिशाभूल केली त्याबद्दल त्यांनी उठाबशा काढाव्यात.”

हेही वाचा : “राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो”, नीलम गोऱ्हे यांचा गंभीर इशारा

“हाती काहीही न लागल्याने वैफल्यातून वक्तव्यं”

“एका बाजूला १८ खासदार, ५५-६३ पर्यंत आमदार, अनेक महानगरपालिकेतील सत्ता हे जनतेच्या प्रेम आणि विश्वासातूनच मिळालेली आहे. हाती काहीही न लागल्याने वैफल्यातून काही लोक वक्तव्यं करत आहेत,” असंही नीलम गोऱ्हे यांनी नमूद केलं.