विद्याधर कुलकर्णी

गावकी आणि भावकीचे राजकारण असलेल्या पुणे जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी दिग्गजांना पराभवाचा झटका बसला. तरुणाईकडे सत्ता देण्याकडे मतदारांचा कौल पाहावयास मिळाला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपला प्रभाव असलेल्या ठिकाणी सत्ता राखण्यात यश मिळविले. भारतीय जनता पक्षाने शिरूर, इंदापूर, मावळ या तालुक्यांसोबत इतर ठिकाणी प्रवेश केला आहे. भोर, वेल्हे, पुरंदर तालुक्यांमध्ये काँग्रेसने वर्चस्व राखले आहे. शिवसेनेला खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांसह ठिकठिकाणी यश मिळाले आहे.

जिल्ह्य़ातील ७४६ ग्रामपंचायतींपैकी ९५ ग्रामपंचायतींचे सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. एका ग्रामपंचायतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. स्थानिक परिस्थिती पाहून काही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाआघाडी केली होती. तर, काही ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेनेत, तर काही ठिकाणी  राष्ट्रवादी-भाजपमध्ये लढती रंगल्या. बारामतीतील सांगवीमध्ये चंद्रराव तावरे यांच्या पॅनेलचा पराभव झाला. पुरंदरमधील निकालामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, माजी सदस्य सुदाम इंगळे आणि माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या पॅनेलला मतदारांनी नाकारले. खेडमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना सातपुते, तर नीरेमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती दत्ता चव्हाण यांचा पराभव झाला. हवेलीतीलस सोरपातवाडीमध्ये सहा दशकांनंतर सत्तांतर झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांनी वर्चस्व राखले आहे. इंदापूरमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटामध्ये तगडी लढत झाली. महत्त्वाच्या आणि मोठय़ा ग्रामपंचायतींमध्ये यंदा सत्तापरिवर्तन झाल्याचे पाहायला मिळाले.  खेडमध्ये स्थानिक आघाडय़ांचे वर्चस्व असून, आमदार दिलीप मोहिते गटाने अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा केला आहे. पुरंदरमध्ये शिवसेनेने पुन्हा मुसंडी मारल्याचा दावा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला. तालुक्यातील अनेक मोठय़ा ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना पुरस्कृत पॅनेलने सत्ता राखली आहे. भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यांत आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने सत्ता मिळवली. मुळशीमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक गटाने वर्चस्व राखले असून, शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून आमदार झालेले सुनील शेळके यांनी मावळातील अनेक ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा केला आहे. मात्र, भाजपने हा दावा खोडून काढत आपणच गड राखल्याचे सांगितले आहे.