ओदिशातील राऊरकेला येथे पोलिसांनी पकडलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेच्या चार दहशतवाद्यांचा पुण्यातील फरासखाना बाँम्बस्फोटात हात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तेलंगणा पोलिसांचे विशेष पथक आणि ओदिशा पोलिसांनी मंगळवारी (१६ फेब्रुवारी) रात्री केलेल्या संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांना ओदिशातील राऊरकेला येथे पकडले. त्यावेळी पोलिसांशी सुमारे तीन तास दहशतवाद्यांशी चकमक झाली. शेख मेहबूब उर्फ गुड्डु उर्फ समीर उर्फ रमेश शेख इस्माईल (वय२७, रा.गणेश तलाई, खांडवा, मध्यप्रदेश), अमजद उर्फ दाऊद उर्फ पप्पू उर्फ उमर रमजान खान (वय२७, रा. चिराखदान, खांडवा, मध्यप्रदेश), जाकीर उर्फ सादिक उर्फ विक्की डॉन उर्फ विनयकुमार बदरुल हुसेन (वय ३२, रा. सेल्स टॅक्स कार्यालयामागे, खांडवा, मध्यप्रदेश) आणि मोहम्मद अस्लम उर्फ बिलाल अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. हे चौघेजण बंदी घातलेल्या आणि देशातील दहशतवादी कारवाईत गुंतलेल्या सिमी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश या तीन राज्यांत ते सक्रिय होते. राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक त्यांच्या मागावर होते. त्यापैकी तिघा संशयितांची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
ओदिशा येथे चौघे संशयित ओळख लपवून राहत होते. राऊरकेला परिसरात त्यांनी सदनिका भाडेतत्त्वावर घेतली होती. ओदिशात त्यांनी दरोडा घालण्याचे गुन्हे केले होते. त्यांच्याकडून पाच पिस्तूल आणि काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. सन १० जुलै २०१४ रोजी पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दुचाकीच्या डिक्कीत स्फोटके दडवून स्फोट घडविण्यात आला होता. स्फोट घडविण्यासाठी वापरलेली दुचाकी सातारा जिल्हा न्यायालयाच्या आवारातून चोरली होती. गेल्या वर्षी तेलंगणा येथे विशेष पथकासोबत झालेल्या चकमकीत दोन संशयित ठार झाले होते. ते मूळचे मध्यप्रदेशातील होते. या चकमकीत ठार झालेल्या संशयितांचा फरासखाना स्फोटात हात असल्याचे निष्पन्न झाले होते.
दरम्यान मंगळवारी रात्री ओदिशात पकडलेल्या चार संशयितांचा फरासखाना स्फोटात हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यादृष्टीने राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) तपास करण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2016 रोजी प्रकाशित
ओदिशा पोलिसांनी पकडलेल्या चार दहशतवाद्यांचा पुण्यातील फरासखाना बाँम्बस्फोटात हात
हे चौघेजण बंदी घातलेल्या आणि देशातील दहशतवादी कारवाईत गुंतलेल्या सिमी संघटनेचे कार्यकर्ते आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-02-2016 at 03:28 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Simi activists arrested