Sinhagad Soad Closed Updates पुणे : सिंहगड रस्त्यावरील शहरातील सर्वांत मोठ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अवघ्या तीन मिनिटांत झाले. मात्र, या तीन मिनिटांच्या कार्यक्रमामुळे वडगाव पुलाकडून राजाराम पुलाकडे येणारा रस्ता काही काळ बंद ठेवावा लागला. त्यामुळे नांदेड सिटीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. कार्यक्रमस्थळी दुपारी तीन वाजल्यापासूनच नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतुकीचे नियंत्रण करताना पोलिसांचीही दमछाक झाली.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यान उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. याच रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील ५२० मीटर लांबीचा उड्डाणपूल आणि विठ्ठलवाडी कमान ते फन टाइम चित्रपटगृह हा २ हजार १२० मीटर लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी यापूर्वीच खुला करण्यात आला आहे. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील गोयल गंगा चौक ते इनामदार चौक हा १ हजार ५४० मीटर लांबीचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. कामे पूर्ण होऊनही हा पूल गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. अखेर सोमवारी त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

उड्डाणपुलाचे लोकार्पण दुपारी तीन वाजता होणे अपेक्षित होते. त्यामुळे त्यापूर्वीपासूनच सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा दुपारी चार वाजून २४ मिनिटांनी कार्यक्रमस्थळी आला. उड्डाणपुलाच्या कोनशिलेचे अनावरण करून पुलावरील फीत कापून चार वाजून २७ मिनिटांनी फडणवीस यांचा ताफा पुलावरून बाहेरही पडला. या ठिकाणी बॅटरीवर चालणाऱ्या गोल्फ कार्टचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, फडणवीसांनी त्यांच्या वाहनातूनच पुलाची पाहणी करणे पसंत केले. नंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरू असल्याने कार्यक्रमस्थळी मोठा बंदोबस्त होता. आमदार, महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी वगळता अन्य राजकीय कार्यकर्त्यांनाही कार्यक्रमस्थळी प्रवेश नाकारण्यात आला.

वाहतूक कोंडी दूर होईल’

‘या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी दूर होईल,’ असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘अडीच किलोमीटर लांबीचा आणि तीन टप्प्यांतील हा उड्डाणपूल पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे. यामुळे येथील वाहतूक व्यवस्थापन सुकर होईल. कोंडी दूर होऊन प्रदूषणही कमी होईल. हा पूल नियोजित कालावधीच्या सहा महिने आधीच वापरासाठी खुला झाला असून, ही पुणेकरांसाठी गणेशोत्सवाची भेट आहे.’