पुणे : राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) लागू करण्यात आलेल्या नव्या पद्धतीनुसार मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनासाठी उच्च शिक्षण संस्थांच्या नोंदणीचे संकेतस्थळ अद्याप कार्यान्वित करण्यात आलेले नाही. त्यामुळे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन न झालेल्या राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना त्याबाबत सहा महिने शिथिलता देण्यात आली आहे.

राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या बाबतचे निर्देश विद्यापीठांच्या कुलसचिवांना परिपत्रकाद्वारे दिले आहेत. नॅक मूल्यांकन महाविद्यालय, विद्यापीठाच्या गुणवत्तेचे मापदंड आहे. शैक्षणिक गुणवत्ता, दर्जा प्राप्त करण्यासाठी दर पाच वर्षांनी महाविद्यालयाचे मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करून घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठ, संलग्नित सर्व पात्र महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करणे अनिवार्य आहे. त्यानुसार राज्यातील बहुसंख्य महाविद्यालयांनी मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनाद्वारे नॅककडून नॅक मूल्यांकन दर्जा प्राप्त करून घेतला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने बहुविद्याशाखीय शिक्षण, कौशल्य आधारित अभ्यासक्रम, परीक्षा मूल्यमापन यांत आमूलाग्र बदल होत आहेत. या दृष्टिकोनातून महाविद्यालयांनी नॅक मानांकन, मूल्यांकनाच्या प्रक्रियेतून गुणवत्ता राखणे, गुणवत्ता वाढ करणे अपेक्षित आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, नॅक आणि महाराष्ट्र शासन नॅक मानांकन, मूल्यांकनाबाबत आग्रही आहेत. मात्र, ‘नॅक’च्या फेब्रुवारी, २०२५ च्या निर्देशानुसार एप्रिल २०२५ पासून दुहेरी मानांकन पद्धती लागू करण्यात आली आहे. ही पद्धती लागू करण्याच्या अनुषंगाने ‘नॅक’कडून उच्च शिक्षण संस्थांसाठीचे संकेतस्थळ अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नव्याने मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करण्यासाठीची उच्च शिक्षण संस्था नोंदणी कार्यान्वित नसल्याने महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनासाठी नोंदणी करणे शक्य होत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पार्श्वभूमीवर, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांंनी विद्यार्थी हितास्तव नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनासाठी महाविद्यालयांना मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांमधील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, या दृष्टीने ‘नॅक’कडून मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करण्यासाठी सहा महिने शिथिलता देण्यात येत आहे. ‘नॅक’कडून उच्च शिक्षण संस्था नोंदणीचे संकेतस्थळ कार्यान्वित झाल्यावर मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनाबाबतची प्रक्रिया तातडीने करावी, याबाबत विद्यापीठांनी योग्य प्राधिकरणामार्फत आवश्यक ती कार्यवाही करावी, त्याबाबत संबंधित महाविद्यालयाकडून आवश्यकतेनुसार लेखी हमीपत्र घ्यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.